बीड । प्रतिनिधीबीड शहरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात

बीड । प्रतिनिधी
बीड शहरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख कामरान खान (एकनाथ शिंदे गट) यांनी केली आहे. अन्यथा 20 फेब्रुवारी 2026 पासून बीड नगरपालिकेच्या दारात आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांनी लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले केले असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अनेक नागरिकांना चावा लागून गंभीर जखमा झाल्याच्या घटना देखील नोंदवल्या गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दिवसेंदिवस भीती वाढत आहे. राज्यात भटक्या कुत्र्यांकडून चावा घेण्याच्या घटनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने, अशा कुत्र्यांची नसबंदी करणे व रेबीज विरोधी लस देणे याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचनांच्या चौकटीत राहून कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी विशेष निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी दि. 12 जुलै 2025 रोजी जाहीर केले होते. केंद्र सरकारच्या सूचनांनुसार, भटक्या कुत्र्यांची नसबंदी केल्यानंतर त्यांना पकडलेल्या ठिकाणीच पुन्हा सोडणे बंधनकारक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या उपाययोजनांसाठी निविदा काढतात. मात्र बीड शहरासह परिसरात समस्या गंभीर स्वरूप धारण करत असल्याने बीड नगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, असे खान यांनी स्पष्ट केले. कामरान खान यांनी सांगितले की, नगरपालिकेने त्वरित ठोस पावले उचलली नाहीत तर आंदोलन अटळ राहील.

COMMENTS