मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात ठाकरे गटाच्या हातून शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हातातून गेल्यानंतर ठाकरे गटाकडून राज्यभरात सभा घेत, संघटन वाढव
मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात ठाकरे गटाच्या हातून शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हातातून गेल्यानंतर ठाकरे गटाकडून राज्यभरात सभा घेत, संघटन वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर शिवसेना देखील सभा घेतांना दिसून येत आहे. एकीकडे ठाकरे गटाच्या सभा, तर त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या सभांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना देखील राज्यात धनुष्यबाण यात्रा काढणार असून, त्याची सुरूवात छत्रपती संभाजीनगरमधून होणार आहे.
महाविकास आघाडीच्या याच सभांना उत्तर देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरणार आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिलला होणार्या महाविकास आघाडीच्या सभेनंतर मुख्यमंत्री शिंदे राज्यभरात ’धनुष्यबाण यात्रा’ काढणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या ’धनुष्यबाण यात्रे’ची सुरवात देखील छत्रपती संभाजीनगर मधूनच होणार आहे. आठ किंवा नऊ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून मुख्यमंत्री शिंदे यांच्या धनुष्यबाण यात्रेला सुरवात होणार आहे. जिथे उद्धव ठाकरे सभा घेत आहेत त्याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा होत असल्याचा उल्लेख मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत केला होता. विशेष म्हणजे असेच काही चित्र आगामी काळात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण ज्या छत्रपती संभाजीनगरमधून महाविकास आघाडी शिंदे-फडणवीस विरोधात रणशिंग फुकणार आहेत. त्याच संभाजीनगरमधून एकन शिंदे यांची धनुष्यबाण यात्रा सुरु होणार आहे. विशेष म्हणजे ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या आहेत, त्याचा मैदानावर एकनाथ शिंदे यांची ’धनुष्यबाण यात्रे’ची सभा होणार आहे. तर आठ किंवा नऊ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून मुख्यमंत्री शिंदे यांच्या धनुष्यबाण यात्रेला सुरवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात होणार्या महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरेंची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर याच सभेला उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरमधून धनुष्यबाण यात्रा काढणार आहे. दरम्यान धनुष्यबाण यात्रेच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांची भव्य सभा देखील होणार आहे. यासाठी उद्धव ठाकरे ज्या मराठवाडा संस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेणार आहेत, त्यापेक्षा मोठ्या मैदानाचा शोध शिंदे गटाकडून घेण्यात येत होता. मात्र त्यापेक्षा मोठा मैदान उपलब्ध न झाल्याने अखेर मराठवाडा संस्कृतिक मंडळाच्या मैदानावर एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. यासाठी शिवसेनेकडून परवानगी मागितली जाण्याची शक्यता आहे. तसेच महाविकास आघाडीतील तीन पक्ष आणि मी एकटा असे दाखवण्याचा प्रयत्न देखील एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न असेल असेही बोलले जात आहे.
छत्रपती संभाजीनगर राजकारण्यांच्या केंद्रस्थानी – शिवसेनेची स्व. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापना केल्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला हा छत्रपती संभाजीनगर राहिला आहे. छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेना मोठया प्रमाणात वाढली. त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेना अर्थात शिंदे गट आणि ठाकरे गट छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले पाय घट्ट करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीत सर्वाधिक पाच आमदार छत्रपती संभाजीनगरमधूनच मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गेले होते. तर मंत्रिमंडळात देखील सर्वाधिक तीन मंत्रिपद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मिळाले आहेत. त्यातच आता शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांकडून राज्यभरात एकत्रित होणार्या सभांची सुरवात देखील छत्रपती संभाजीनगरमधूनच होत आहे. तर याला उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाण यात्रेची सुरवात देखील याच शहरातून होणार आहे.
COMMENTS