शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांचा न्यायनिवाडा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, तो पुन्हा पुढे ढकलला गेला, यावरून उद्धव ठाकरे यांनी सरन्
शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांचा न्यायनिवाडा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, तो पुन्हा पुढे ढकलला गेला, यावरून उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीशांपासून तर न्यायपालिकेवर बरेच प्रश्न उपस्थित केले. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात निवडणुकीचे पडघम आता निवडणुका घोषित होण्यापूर्वी सुरू झाले आहेत. यात काही पक्ष रॅली काढत आहेत, तर, काही पक्ष आपले उमेदवार घोषित करित आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी आपल्या जवळपास २४ संभाव्य उमेदवारांची यादी जवळपास जाहीर केली आहे. यामध्ये जी नाव घेण्यात आली आहे, ती नावे पाहता, असा संभ्रम आपल्यात निर्माण होऊ शकतो की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट ही खरेच आहे की केवळ काहीतरी चाललेलं आहे! विधानसभेमध्ये महाविकास आघाडी जेव्हा सत्तेवरून गेली, त्यावेळी विधानसभेत स्थायी अध्यक्ष पद नव्हते. त्यामुळे, उपाध्यक्ष असलेले नरहरी झिरवळ यांनीच अध्यक्षा सारखे विधानसभेचे काम पाहिले. विधानसभेच्या कामकाजावर त्यांनी आपला ठसा निश्चितपणे उमटवला. महाविकास आघाडीतून फुटून निघालेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांच्या विषयी; खासकरून पहिल्या १६ आमदारांच्या विषयी नरहरी झिरवळ यांनी जे भाष्य केलं, ते आजही न्यायालयात प्रलंबित असलेल्या न्यायनिवाड्यासाठी वापरले जाईल, यात शंका नाही! महाविकास आघाडीचे विभाजन होत असताना, किंबहुना, महाविकास आघाडी सत्तेवरून जात असताना नरहरी झिरवळ यांची भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात कौतुकास्पद होती. परंतु, नंतरच्या काळात त्यांनी उभे दोन गट झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्यासोबत जाण्यास प्राधान्य दिले. एकाच वेळी जवळपास ४० आमदार अजित पवार यांच्या सोबत गेल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस ही पूर्णपणे अजित पवार यांच्याकडे गेल्याचं चित्र दिसलं; परंतु, पक्ष हा संसदीय राजकारणाचा भाग असला तरी त्याच्या विभाजनाची प्रक्रिया ही पक्षीय पातळीवरच गणली जाते. त्यामुळे अजित पवार यांच्यापेक्षा शरद पवार गटाचा पक्ष अधिकृत राहील, अशी धारणा लोकांमध्ये होती. ज्या पद्धतीने निवडणुका आयोगाचा निकाल आला; त्यातून पक्ष हा अजित पवार गटाकडे गेला. त्याच अजित पवार यांच्याकडे नरहरी झिरवळ हे देखील स्थिरावले. परंतु, नवलाईची बाब अशी की, शरद पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी जी संभाव्य २४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे; त्यामध्ये, गोकुळ झिरवळ यांचा समावेश आहे.
हा प्रश्न कोणत्याही सामान्य माणसासमोर उभा राहू शकतो. ज्या नरहरी झिरवळ यांनी शरद पवार यांच्या गटाला नाकारले, त्याच शरद पवार यांनी त्यांचा मुलगा गोकुळ झिरवळ याचा समावेश संभाव्य उमेदवारांमध्ये करणे, याचा अर्थ या पक्ष फुटीतून त्यांना चीड आलेली आहे की, नाही? केवळ जिंकून येण्याच्या निकषासाठी त्याच कुटुंबातील सदस्य हवा, यावर ते ठाम आहेत का? असाही प्रश्न निर्माण होतो. त्याचबरोबर त्यांच्या संभाव्य यादीमध्ये एका अनुसूचित जाती राखीव मतदार संघामध्ये एका एनटी म्हणजे भटक्या विमुक्त जाती समूहातील व्यक्तीला तिकीट देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. याचा अर्थ म्हणजे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातही बोगस जातीचा दाखला घेऊन निवडणूक लढविणाऱ्यांसाठी शरद पवार हे रान मोकळे करत आहेत का? जर त्यांनी कुस बदललेल्या राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट पारदर्शीपणाने पुढे येत नसेल, किंबहुना, आज पावेतो ज्या पद्धतीचे डावपेचांचे रजकारण त्यांनी केलं; तेच डावपेच घेऊन ते या पुढचे ही राजकारण करणार असतील, तर, निश्चितपणे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा मतदार त्यावर सुज्ञपणाने विचार करेल. गेल्या दहा वर्षात ज्या पद्धतीने देशाचं राजकारण कलाटणी घेऊन वाटचाल करत आहे; त्या दहा वर्षात सर्वसामान्य जनतेने म्हणजे मतदारांनी जो संदेश घेतला आहे तो एवढाच की, आता कोणताही पक्ष जनतेची किंवा मतदारांची केवळ दिशाभूल करू पाहतो आहे. दिशाभूल करून त्यांची मते घेऊन सत्तेवर येण्याचं राजकारण करू पाहतो आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जी परिस्थिती उद्भवली, त्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या मतदारांनी जे महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहिले आणि या सहानुभूती ची लाटेतून लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या गटाला जनतेने भरघोस मतदान केले. पण, याचा अर्थ तुम्ही राजकारण नेहमीच वाकडेतिकडे करत असाल, तर ती जनता सहनच करेल, अस असं होत नाही. महाराष्ट्राच्या जनतेने जी सहानुभूतीची लाट लोकसभेत तुमच्या पाठीशी उभी केली, ती तशीच कायम राहावी, असे वाटत असेल तर, तुम्ही उमेदवार फार नामांकित दिला नाही तरी, मतदारांना ते चालणारे आहे. परंतु, तुम्ही उमेदवार देताना जर सामाजिक अन्यायाची भूमिका उभी करत असाल तर, ते मात्र मतदार सहन करणार नाही. त्यामुळे जे नेते, जे आमदार तुम्हाला सोडून गेले म्हणजे खास करून शरद पवारांना सोडून गेले, त्यांच्याच कुटुंबाचं पुनर्वसन पुन्हा राजकीयदृष्ट्या करत असाल तर याचा अर्थ या पक्षातील फूट ही केवळ बळेबळेच आहे, असा त्याचा अर्थ होईल. राजकारणात शह देताना अशा प्रकारचे राजकारण केले जात असले तरी ते फारसे समर्थनीय राहत नाही. जी लोक तुम्हाला सोडून गेली त्यांच्या सोडून जाण्यावर शिक्कामोर्तब करून ते प्रकरण तिथेच संपवणं, हे शहाणपणाचे लक्षण राहतं. अन्यथा आपण आपल्याबरोबर लोकांनाही राजकारणात धोके देत राहिलो, तर एक ना एक दिवस लोक आपली भूमिका स्पष्टपणे घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचे दृश्य परिणाम दाखवल्याशिवाय जनता स्वस्थ बसत नाही.
COMMENTS