Homeताज्या बातम्यासंपादकीय

शरद पवार : उघड पुरोगामी, छुपे प्रतिगामी !

महाराष्ट्राच्या राजकारणात जन संघटक म्हणून राजकीय उदय ज्यांचा झाला, ते नाव म्हणजे शरद पवार! पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच विद्यार्थी नेते म्

विरोधाची एकजूट : पर्याय आणि अडचणी !
धोकेबाजीची उलटी गणती ! 
शह-प्रतिशह !  

महाराष्ट्राच्या राजकारणात जन संघटक म्हणून राजकीय उदय ज्यांचा झाला, ते नाव म्हणजे शरद पवार! पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच विद्यार्थी नेते म्हणून ते उदयास आले. त्याच काळात महाराष्ट्रात काँग्रेस अंतर्गत गटांचा सत्ता संघर्ष ही उदयास येत होता.  नेमका याच काळामध्ये शरद पवार यांचा राजकीय उदय होतो. सर्वप्रथम त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. पण महाराष्ट्र पिंजून काढत असताना सर्वच क्षेत्रातील माणसांची किंवा तज्ञांशी त्यांनी जनसंपर्क केला. एका बाजूला कुणबी आणि मराठा समाजात त्यांचं संघटनात्मक असणार स्थान आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील उच्चभ्रू समाज जो त्याही काळात नेतृत्वविहीन होता; त्यांची बौद्धिक आणि सांस्कृतिक स्तरावर त्यांना मिळालेली मदत, यातून प्रसार माध्यमांमध्ये शरद पवार यांचे व्यक्तिमत्व सातत्याने चर्चेला येत राहिले. त्यांच्यात असलेले आणि नसलेले पैलू ही प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात मांडण्यात आले. व्यक्ति म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा प्रभाव महाराष्ट्राच्या जनतेवर निर्माण करण्यात प्रसारमाध्यमांचा म्हणजे तत्कालीन वृत्तपत्रांचा मोठा सहभाग आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून वेगळं होताना, अजित पवार यांनी प्रामुख्याने जी गोष्ट मांडली होती; ती, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही एक हाती सत्ता मिळाली नाही आणि राज्याचे मुख्यमंत्री पदही मिळालं नाही! अजित पवार यांच्या या शब्दांमध्ये शरद पवार यांच्या मर्यादा स्पष्ट होतात. महाराष्ट्रात संघटक नेता म्हणून जरी ते असले, तरी ते प्रामुख्याने मुत्सद्दी आणि आतील राजकारण करण्यात प्रख्यात आहेत. एका बाजूला ते एखाद्याला एक आश्वासन देतात आणि दुसऱ्या बाजूला वेगळ्या पद्धतीच्या घटना घडवतात; ही त्यांची खासियत आहे! त्यांना यशवंतराव चव्हाण यांचा वारसा मानला जाते. त्यामुळे त्यांच्या पद्धतीनंच त्यांनी त्यांचं राजकारण केलं. यशवंतराव चव्हाण हे त्यांच्या राजकीय शिक्षणातील गुरु आहेत. त्यामुळे त्याच प्रकारचे  राजकारण आणि सत्ताकारण त्यांनी महाराष्ट्रात केलं. जेव्हा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र सोडून दिल्लीला गेले त्यावेळी, ते आपला विश्वासातला मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांना नियुक्त करून गेले. ज्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सलग अकरा वर्षे भूषविले. तर, शरद पवार यांनी हेच सत्ताकारण पुढे केले. ते महाराष्ट्रातून दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात जात असताना, सुधाकरराव नाईक यांना त्यांनी आपला वारस म्हणून नियुक्त केलं. पण, अवघ्या काही महिन्यातच शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यांचे संबंध दुरावले.

त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ते पुन्हा मुख्यमंत्री होऊन परतले होते. अर्थात, शरद पवार यांनी काही पुरोगामी बाबी महाराष्ट्राच्या सत्ताकारणात निश्चित केल्या; परंतु, समाजातला संघर्ष मात्र त्यांनी कायम सुरू ठेवला. नामांतराच्या संदर्भात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झालेला संघर्ष याचा आरोपही शरद पवार यांच्यावर होतो. ओबीसींच राजकारण त्यांनी महाराष्ट्रात उभे राहू दिले नाही. परंतु, हे राजकारण दाबताना त्यांनी महाराष्ट्रातील ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याची नामी युक्ती केली. या आरक्षणात ओबीसींना सहभाग मिळाला. सत्तेचा हा छोटा सहभाग ओबीसींच्या राजकीय महत्त्वाकांक्षा जागृत करणारा ठरला. परंतु, ओबीसींचा राजकीय पक्ष उभा राहणार नाही, याची पुरती काळजीही त्यांनी घेतली. शरद पवार हे एकाच वेळी पुरोगामीही वाटतात आणि प्रतिगामीही वाटतात. परंतु, त्यांचे उघड स्वरूप हे नेहमी पुरोगामींच्या बाजूने राहिलेले आहे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरी बाजू ही नेहमीच भांडवलदार आणि उच्च जातीयांशी संबंधांमध्येच राहिली आहे. गेल्या काही वर्षात देशात नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील भाजपची सत्ता असतानाही नरेंद्र मोदी यांना बारामती ते आणू शकतात, अमित शहा यांच्याशी ते मैत्री करू शकतात आणि दुसऱ्या बाजूला ते त्यांच्या विरोधात राजकीय आघाडीवर ही मजबूतपणे उतरू शकतात. ज्यावेळी नरेंद्र मोदी यांना त्यांच्या राजकारणावर देशाचा आणि केंद्र सरकारचा एक प्रकारे बायकाॅट होता त्यावेळी ते नरेंद्र मोदी यांना शिष्टमंडळात  चीनच्या दौऱ्यावर घेऊन गेले होते. ही त्यांनीच कबूल केलेली बाब आहे. दुसऱ्या बाजूला, ज्या देशाच्या लोकसभा आणि राज्यसभेत अदाणींच्या संदर्भात मोठा गदारोळ होतो, त्याचवेळी अदानी त्यांना भेटायला मुंबई शहरामध्ये येतात! या परस्परविरोधी बाबी आहेत. या शरद पवार यांच्या राजकारणाचा स्थायीभाव आहे.२०१९ मध्ये महाविकास आघाडी करून त्यांनी राजकीय सत्ता महाराष्ट्रात बनवली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या मनात मुख्यमंत्री दुसरा असताना, शरद पवार यांनी त्यांना स्वतःलाच मुख्यमंत्री होणं भाग पाडलं. परिणामी शिवसेनेत अस्वस्थता आली आणि ती फुटीच्या रूपात ही प्रकट झाली! शरद पवार एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बळही देतात. त्यांची राजकीय भूमिका ही स्वीकारतात आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींचा राजकारणातला समावेश ते मर्यादित करतात. अशा वेगवेगळ्या पैलूंनी शरद पवार यांचे व्यक्तिमत्व आपल्याला राजकारणामध्ये नेहमी दिसतं. त्यामुळे एक प्रकारे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील पूर्ण सत्ता न मिळवलेले अस्वस्थ नेते आहेत! ज्यांचे व्यक्तिमत्व पुरोगामी की प्रतिगामी हे ठरवायलाच कठीण होऊन बसले!

COMMENTS