Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड शहरात 548-डी महामार्गाचा बोजवारा; चौकशीची मागणी

अहिल्यानगर : राष्ट्रीय महामार्ग क्र. 548-डी अंतर्गत जामखेड शहर हद्दीत सुरू असलेल्या रस्ते कामातील अनियमितता, निकृष्ट दर्जा, रस्त्याची रुंदी व संरेखनात

Buldhana : शेतकऱ्यांना मोबदला न देता राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु (Video)
अर्धवट महामार्ग कामामुळे ग्रामस्थ संतप्त; आंदोलन तीव्र
Sangamner : संगमनेर शहरातील चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार (Video)

अहिल्यानगर : राष्ट्रीय महामार्ग क्र. 548-डी अंतर्गत जामखेड शहर हद्दीत सुरू असलेल्या रस्ते कामातील अनियमितता, निकृष्ट दर्जा, रस्त्याची रुंदी व संरेखनातील विसंगती, तसेच महामार्गालगतच्या अतिक्रमणांबाबत तातडीने चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जामखेड येथील नागरिक चंद्रकांत (अवधूत) आदिनाथ पवार यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

 निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जामखेड ही सहा-सात तालुक्यांसाठी महत्त्वाची बाजारपेठ असून भौगोलिकदृष्ट्या मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून शहराची ओळख आहे. या शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग 548-डी हा वाहतूक व व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, जामखेड-सौताडा रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी निश्चित असतानाही हे काम गेल्या ३-४ वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

 जामखेड शहर हद्दीत महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असून, राष्ट्रीय महामार्ग 548-डी  वरील इतर भागांमध्ये अतिक्रमण हटविण्याची कारवाई प्रशासनाकडून झाली असताना, जामखेडमध्ये मात्र अद्याप सर्वसमावेशक कारवाई झालेली नाही, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच काही अतिक्रमणांवर कारवाई होत असताना काही प्रभावशाली व्यक्तींची पक्की बांधकामे कायम असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद आहे.

 दरम्यान, रस्त्याचे काम करताना काही ठिकाणी रुंदी कमी तर काही ठिकाणी जास्त ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले असून, निकृष्ट कामामुळे अल्पावधीतच रस्त्याची अवस्था खराब होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जियो-टॅगिंगच्या नावाखाली सेंटर लाईन बदलण्यात आल्याची शंका उपस्थित करून, डीपीआर, जियो-टॅगिंग नोंदी व प्रत्यक्ष मोजणीची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी गटारांचे काम वेडेवाकडे झाल्यामुळे रस्त्याचे संरेखन व मोजमापाबाबत प्रश्न निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

 याशिवाय बीड रोड परिसरात महावितरणचे विद्युत खांब न हलवता रस्त्याचे काम करण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद आहे. तसेच शहरातील वाहतूक कोंडी तात्काळ मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

 या संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करून दोषी ठरणाऱ्या संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांची जबाबदारी निश्चित करावी, तसेच जामखेड शहर हद्दीतील राष्ट्रीय महामार्गालगतची सर्व अतिक्रमणे नियमानुसार हटवावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून तातडीने कारवाई न झाल्यास उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशारा अर्जदारांनी दिला आहे.

COMMENTS