गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय कुस्तीपटू संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटू महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले असून, त्यांच्याव
गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय कुस्तीपटू संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटू महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कुस्तीपटू आक्रमक झाले आहेत. तर केंद्र सरकार आणि पोलिस प्रशासन हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून प्रयत्न करतांना दिसून येत आहे. भाजप हा पक्ष नेहमी पक्षाच्या हिताचा विचार करून निर्णय घेणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. पक्षापुढे व्यक्तीनिष्ठा गौण समजल्या जातात. मात्र कुस्तीपटू संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांना भाजप पाठीशी घालत आपलीच प्रतिमा मलीन का करून घेत आहे, हा यक्षप्रश्न आहे. ब्रिजभूषण सिंह यांना या पदावरून हटवून, चौकशी समितीची स्थापना करून, याप्रकरणी कारवाई करता आली असती. मात्र ज्या महिला कुस्तीपटू इतक्या आक्रमकपणे, आंदोलन करत असतांना, पोलिसांकडून सदर आंदोलन दडपण्यासाठी सातत्याने प्रयत्न होतांना दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणात कुठेतरी तथ्य असल्याचे दिसून येत आहे. कुस्तीपटूंसोबत केंद्र सरकार आणि पोलिस ज्या पद्धतीने वागत आहे, त्यावरून सरकार आपलीच प्रतिमा मलीन करून घेतांना दिसून येत आहे. महिला कुस्तीपटूंची फरफट सुरू आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहे, त्यांना जबरदस्तीने उचलून नेण्यात येत आहे, मारहाण होत आहे, हा सगळा प्रकार संपूर्ण देश पाहत असतांना, काही भक्तांना ही नौटंकी वाटतेय. मात्र कुस्तीपटू विनाकारण इतक्या हट्टाला सहजासहजी पेटणार नाही. भविष्यात आपल्यावर कारवाई होवू शकते, भविष्यात आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास बंदी घातली जावू शकते, याची कल्पना खेळाडूंना असतांना देखील, त्यांनी आपली कारकीर्द पणाला लावलेली दिसून येत आहे. यातच खेळाडूंनी आपली पदके गंगा नदीत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र तो स्थगित करत, ही पदके शेतकरी नेत्यांकडे सुपूर्द करण्यात आली असून, सरकारला पाच दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. वास्तविक पाहता, जे खेळाडू आंदोलन करत आहेत, त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचावले आहे. त्यामुळे त्यांची ही कृती ब्रिजभूषण सिंह यांना टार्गेट करणारी नसून, न्याय मागणारी असल्याचे दिसून येत आहे. क्रीडा क्षेत्रातील लैंगिक शोषणाचे आरोप गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. केवळ कुस्तीच नाही तर इतर काही खेळांमध्येही लैंगिक शोषणाचे आरोप आणि घटना समोर आल्या आहेत. ह्यात काही प्रकरणांची चर्चा झाली, काही वेळा कारवाईही झाली तर काही वेळा चौकशीचं पुढे काय झालं हे समोर आलेलं नाही. पण या घटना म्हणजे हिमनगाचं केवळ टोक असल्याचंही सांगितलं जात आहे. लैंगिक अत्याचाराविषयी वाढलेली जागरुकता आणि ’मी टू मूव्हमेंट’ यामुळे आता अशा घटनांनंतर तक्रारी नोंदवण्याचं प्रमाण वाढलं आहे. पण नेमकी ही समस्या किती गंभीर आहे, हे समजणं अवघड आहे. कारण लैंगिक शोषणाविषयी भारतात अजूनही उघडपणे बोललं जात नाही आणि भारतीय खेळांचाही त्याला अपवाद नाही. मात्र क्रीडा क्षेत्राची झाडाझडती घेण्याचे औदार्य कोणत्याच सरकारने दाखवलेले नाही. ब्रिजभूषण यांच्याविरोधात लैंगिक शोषण आणि पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल केले असतांना, त्यांना अटक करण्यात आलेली नाही. तर दिल्ली पोलिसांकडून ब्रिजभूषणला अटक करण्याइतपत पुरावे आजपर्यंत मिळालेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. पोक्सोच्या कलमातही सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे, त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. तसेच, खासदाराने पीडितांशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्याचा आणि पुरावा नष्ट करण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नसल्याचे स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिले आहे. ब्रिजभूषण यांना अटक केल्यास भाजपची प्रतिमा मलीन होईन, अशी भीती भाजपला वाटत आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळे भाजपची प्रतिमा मलीन होत आहे, त्याचे काय ?
COMMENTS