रांची : छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पोलिस आणि केंद्रीय

रांची : छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या संयुक्त पथकाने राबविलेल्या नक्षलवादविरोधी मोहिमेदरम्यान दक्षिण अबुझमादच्या जंगलात पहाटे तीनच्या सुमारास चकमक सुरू झाली. या ऑपरेशनमध्ये नारायणपूर, दंतेवाडा, बस्तर आणि कोंडागाव जिल्ह्यांतील जिल्हा राखीव रक्षक आणि सुरक्षा दलांशी तुकड्यांचा समावेश होता. नारायणपूर, दंतेवाडा, बस्तर आणि कोंडागाव जिल्ह्यातील पोलिसांच्या जिल्हा राखीव रक्षकचे कर्मचारी तसेच सीआरपीएफच्या पथकांनी या कारवाईत सहभाग घेतला, असे एका अधिकार्याने सांगितले.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, अबूझमाडच्या जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी लपले असल्याची माहिती बस्तर पोलिसांना मिळाली होती. यानंतर दहा तारखेला चार जिल्ह्यातील सुरक्षा दलाच्या जवानाना या ठिकाणी पाठवण्यात आले. गेल्या दोन दिवसापासून सुरक्षा दलाचे जवान जंगलात ठाण मांडून बसले होते. त्यानंतर गुरूवारी पहाटे जवानांची तुकडी नक्षलवाद्यांच्या अड्ड्यावर पोहोचली. त्यानंतर जवान आणि नक्षली यांच्यात चकमक उडाली. जवळपास सहा ते सात तास ही चकमक सुरू होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन करण्यात आले. त्यात सात नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. या चकमकीत अनेक नक्षलवादी जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानंतर अनेक नक्षली पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. अजूनही सुरक्ष दलाचे जवान जंगलात उपस्थित आहेत. या भागात आता सर्च ऑपरेशन केले जात आहे. या चकमकीत मारले गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ज्या नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे त्यांची ओळख अजून झालेली नाही. पोलिस मुख्यालयात पोहोचल्यानंतर त्यांची ओळख पटवली जाईल. दंतेवाडाचे एसपी गोरव राय यांनी चकमक झाली असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान गेल्या वर्षभरात जवळपास 220 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर गेल्या पाच वर्षात 219 जणांना यम सदमी पाठवण्यात आले आहे. नक्षलवाद्यांना संपवण्यासाठी हायटेक यंत्रणेचा वापर केला जात आहे. ड्रोनच्या सहाय्याने नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. त्यातून त्यांचा पत्ता सापडत आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांना टिपण्यात यश येत आहे. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
COMMENTS