तब्बल 42 तोळे सोने हस्तगत…सतरा घरफोड्या उघडकीस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तब्बल 42 तोळे सोने हस्तगत…सतरा घरफोड्या उघडकीस

स्थानिक गुन्हे अन्वेषणने चौघांना पकडले, पोलिस अधीक्षकांकडून कौतुक

अहमदनगर/प्रतिनिधी : राणीहार, गंठण, मणी मंगळसूत्र, कानातील झुंबर, अंगठ्या, चेन, टॉप्स, नेकलेस, डोरले, कानातील वेल, बोरमाळ बांगड्या असे एकुण 42 तोळे वज

अहमदनगर शहरात राष्ट्रवादीला जबर झटका… माजी विरोधीपक्षनेता काँग्रेसमध्ये सामील
समीर वानखेडे आमचा जावई नाही – चंद्रकांत पाटील (Video)
…तर, नगर अर्बनच्या प्रशासकांना काळे फासणार ; अर्बन बचाव कृती समिती आक्रमक पवित्र्यात

अहमदनगर/प्रतिनिधी : राणीहार, गंठण, मणी मंगळसूत्र, कानातील झुंबर, अंगठ्या, चेन, टॉप्स, नेकलेस, डोरले, कानातील वेल, बोरमाळ बांगड्या असे एकुण 42 तोळे वजनाचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी हस्तगत केले असून, 17 घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत. या प्रकरणी चौघांना अटकही करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची ही टोळी आहे.या दमदार कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके व त्यांच्या सहकार्‍यांचे कौतुक केले आहे. मागील सुमारे 2-3 महिन्यात नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर तालुका, शेवगांव, पाथर्डी व राहुरी या ठिकाणी चोरी व घरफोडी करुन दागिने व रोख रक्कम चोरी झाली होती. चोरीचे हे दागिने मोडण्याच्या प्रयत्नात चोरटे होते. त्याचा सुगावा पोलिस निरीक्षक कटके यांना लागल्यावर त्यांनी सापळा रचून चौघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून 42 तोळे दागिन्यांसह 39 हजार 500 रुपये रोख रक्कम व तीन मोटार सायकल असा असा 23 लाख 52 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राम बाजीराव चव्हाण (वय 20, रा. आष्टी, जिल्हा बीड), तुषार हबाजी भोसले (रा. पिंपरखेड, ता. आष्टी, जि. बीड), प्रवीण उर्फ भाज्या हबाजी भोसले व विनाद हबाजी भोसले (दोन्ही रा. पिंपरखेड, ता. आष्टी जिल्हा बीड) अशी पकडलेल्या या चार आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे चौकशी सुरू असून, त्यांनी केलेले आणखी काही गुन्हे या चौकशीत उघड होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी चास जवळील घुगार्डेवस्ती येथे चोरट्यांनी घरफोडी करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सव्वादोन लाखांचा ऐवज चोरुन नेला होता. तसेच यापूर्वीही जिल्ह्यात श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर तालुका, पाथर्डी, शेवगांव व राहुरी परिसरामध्ये अशा प्रकारचे गुन्हे घडलेले होते. त्यामुळे पोलिस अधीक्षक पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. त्यामुळे या शाखेने केलेल्या कामगिरीची माहिती पोलिस अधीक्षक पाटील यांनी पत्रकारांना दिली.

पाठलाग करून पकडले
चास जवळील घुगार्डेवस्तीवरील घरफोड़ीचा गुन्हा हा आष्टी येथील सराईत गुन्हेगार राम बाजीराव चव्हाण (रा. आष्टी, जिल्हा बीड) व त्याच्या साथीदारांनी केला असून राम चव्हाण व त्याचे साथीदार हे चोरलेल्या सोन्याच्या दागिन्यांची विल्हेवाट लावण्यासाठी नगर येथे येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कटके यांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी नगर-जामखेड रोडवरील आठवड घाट येथे सापळा लावला. संशयित व्यक्तींना त्यांनी थांबण्याचा इशारा करताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिस पथकाने दोन मोटार सायकलवरील चार संशयितांचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. यावेळी आणखी एका मोटार सायकलवरील दोनजण मोटार सायकल तेथेच टाकून घाटामध्ये पळून गेले. जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर तालुका, शेवगांव, पाथर्डी, व राहुरी या ठिकाणी चोरी व घरफोडी करुन दागिने व रोख रक्कम चोरी केल्याचे व ते दागिने हे मोडण्यासाठी चाललो असल्याचे पकडलेल्या आरोपींनी चौकशीत सांगितले.
पकडलेल्या आरोपींपैकी प्रवीण उर्फ भाज्या हबाजी भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे आष्टी पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत. दरम्यान फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांना पकडण्यात आल्यानंतर आणखी काही गुन्हे उघडकीस घेण्याची व आणखी काही मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात शेवगाव, पाथर्डी, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर तालुका आदी पोलिस ठाण्यात 17 ठिकाणी गुन्हे दाखल असून हे गुन्हे या आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना विश्‍वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हे कबूल केले. काही ठिकाणी दिवसा घरफोड्या केल्याचेही सांगितले. या आरोपीविरुद्ध शेवगाव पोलीस ठाणे येथे एक, पाथर्डी पोलीस ठाणे येथे 5, राहुरी पोलीस ठाणे येथे एक, श्रीगोंदा पोलीस ठाणे येथे 1, जामखेड पोलिस ठाणे येथे दोन, नगर तालुका पोलीस ठाणे येथे तीन, कर्जत पोलीस ठाणे येथे तीन अशा एकूण 17 गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी पोलिस ठाण्यात दरोड्याच्या दोन गुन्ह्यांची नोंद आहे.

पोलिसांना मिळणार रिवॉर्ड
सराईत गुन्हेगारांचा सुगावा लागल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कटके यांनी तपासासाठी स्वतंत्र पथक नेमून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक सोपान गोरे, हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, विजय वेठेकर, बबन मखरे, संदीप घोडके, संदीप पवार, विश्‍वास बेरड, भाऊसाहेब कुरूंद, देवेंद्र शेलार, पोलिस नाईक शंकर चौधरी, ज्ञानेश्‍वर शिंदे, सचिन आडबल, संदीप चव्हाण, विजय ठोंबरे, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, लक्ष्मण खोकले, विशाल दळवी, कॉन्स्टेबल रविंद्र घुंगासे, योगेश सातपुते, जालिंदर माने, रोहित मिसाळ, राहुल सोळुंके, आकाश काळे, सागर ससाणे, मयुर गायकवाड, रणजित जाधव, मच्छिंद्र बर्डे, मेघराज कोल्हे, विनोद मासाळकर, चालक हेडकॉन्स्टेबल संभाजी कोतकर, बबन बेरड व चंद्रकांत कुसळकर यांनी सापळा रचून व पाठलाग करून आरोपींना पकडले. चांगली कामगिरी करणार्‍या या पथकातील कर्मचार्‍यांना रिवॉर्ड देणार असल्याचेही पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

दागिने परत घेऊन जावेत
पोलिसांनी 17 घरफोड्यांतून चोरीस गेलेले सुमारे 42 तोळे दागिने हस्तगत केले असून, हे दागिने ज्या व्यक्तींचे आहेत, त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे दागिने घेऊन जावेत, असे आवाहनही अधीक्षक पाटील यांनी यावेळी केले. दरम्यान, पाटील यांनी नागरिकांना आणखी एक आवाहन केले आहे. जिल्ह्याभरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून चोरटे भरदिवसा वा रात्री बंद घराचे कुलूप तोडून चोर्‍या करतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरात मौल्यवान ऐवज ठेवू नये. शक्यतो सोन्याचे दागिने बँकेत लॉकरमध्ये ठेवावे व आपल्या मालमत्तेचे संरक्षण करण्यास पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

COMMENTS