Homeताज्या बातम्यासंपादकीय

दुसऱ्या फेरीचे मतदान आणि काॅंग्रेस मॅन्युफॅस्टो ! 

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. यामध्ये देशातील एकूण १३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण ८९ लोकसभा मतदारसंघात ही न

पुन्हा नोटबंदी अशक्यच ! 
आहारावर वाद करणाऱ्यांचे मनसुबे काय !
मुंबई – महाराष्ट्राचे आर्थिक शोषक !

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. यामध्ये देशातील एकूण १३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण ८९ लोकसभा मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ९ मतदार संघाचा समावेश आहे. ज्यामध्ये, अकोला, बुलढाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पहिल्या फेरी प्रमाणेच दुसरी फेरी देखील अतिशय अटीतटीची होण्याची शक्यता, राजकीय विश्लेषक आणि निरीक्षक नोंदवित आहेत.‌ अर्थात या फेजमध्ये मणिपूर या अतिशय अशांत असलेल्या भागातही मतदान होत आहे. पहिल्या फेरीत देखील मणिपूरला मतदान झाले. एकंदरीत, उत्तर पूर्व राज्यातील अनेक मतदारसंघात हे मतदान होत आहे. परंतु, सर्वाधिक जागा या फेरीत केरळ आणि कर्नाटक या राज्यातील आहेत. केरळमध्ये जवळपास सर्वच मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक पार पडत आहे. यात राहुल गांधी यांचा वायनाड या मतदारसंघाचा देखील समावेश आहे. कर्नाटकात देखील जवळपास सगळेच मतदारसंघ दुसऱ्या फेरीत पूर्ण केले जात आहेत.  साधारणत: मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. निवडणूक आयोगाने देखील यात काही प्रयत्न केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अर्थात, उद्या मतदानात टक्केवारी नेमकी किती वाढते, हे प्रत्यक्षात पाहावे लागेल.  तरीही केरळ आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढण्याची निश्चितपणे शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा असणारी दोन राज्य,  महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश, या दोन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी नऊ लोकसभा मतदारसंघात, आज मतदान होत आहे. या दोन्ही राज्यातील मिळून होणाऱ्या १२८ जागांपैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न सत्ताधारी आघाडी करते आहे. तर, या दोन्ही राज्यांमध्ये इंडिया आघाडी हे आपलं अस्तित्व अधिकाधिक शक्तिमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्याच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष त्यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाच्या बळावर आपला प्रचार करतील, अशी साधारणतः भारतीयांना अपेक्षा होती; परंतु, प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. सध्या तरी, भारतीय जनता पक्षाचे स्टार आणि सर्वात प्रमुख असलेले कॅम्पेनर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे देशामध्ये एकाच दिवसात अनेक सभा घेत आहेत. त्या सर्व सभांमधून आपल्या सरकारच्या कारकिर्दीच्या गोष्टी सांगून मतदारांचे मत घेण्याचा प्रयत्न जराही होताना दिसत नाही. त्याऐवजी त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेस यांना सातत्याने टार्गेट केले आहे. याचा दुसरा अर्थ विश्लेषकांच्या दृष्टीने असा आहे की, गेल्या दहा वर्षात लोकांना सांगण्यासारखी किंवा लोकांची मते घेण्यासारखी कोणतीच कामे न केल्यामुळे, सत्ताधारी पक्षावर ही दुर्दशा ओढवल्याचे सांगितले जाते. 

काँग्रेसचा मॅन्युफॅस्टो यावर ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी दर सभांमध्ये तुटून पडत आहेत, याचा अर्थ, ते काँग्रेसच्या मॅन्युफॅस्टो चा प्रचार करत असल्याचे अनेक विश्लेषकांचे म्हणणे आहे. स्वतः राहुल गांधी यांनी दिल्ली येथे झालेल्या सामाजिक न्याय परिषदेत काँग्रेसचा मॅन्युफॅस्टो कसा वाटला, असा उपस्थित श्रोत्यांना प्रश्न विचारला. त्यावर सर्वांनी क्रांतिकारी असं म्हणून उत्तर दिल्यावर, राहुल गांधी यांनी देखील काँग्रेसचा मॅन्युफॅस्टो क्रांतिकारी आहे आणि त्यामुळे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पॅनिक झाले आहेत, अशा प्रकारे त्यांच्यावर टिकेची झोड उठवली. अर्थात, वर्तमान लोकसभा निवडणुकीच्या आणखी पाच फेऱ्या होतील. एकंदरीत सात फेऱ्यांमधून लोकसभा निवडणूक पूर्ण होईल. शेवटचे मतदान म्हणजे सातवी फेरी एक जून २०२४ रोजी होईल. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होईल. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयामध्ये मतमोजणीच्या संदर्भात व्हीव्हीपॅट मध्ये असलेल्या चिठ्ठ्या शंभर टक्के मोजाव्यात, यासाठी काही याचिका दाखल आहेत. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. परंतु, अपेक्षा अशी आहे की शेवटच्या क्षणी सर्वोच्च न्यायालय व्हीव्हीपॅटच्या द्वारे मतमोजणीचा निर्णय देईल आणि कदाचित ४ तारखेला, या पद्धतीने मतमोजणी होईल; अशी देखील शक्यता नाकारता येत नाही.

COMMENTS