Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरोग्य भरतीतील बिंदू नामावलीत घोटाळा; आमदार पडळकरांचा भाजप सरकारला घरचा आहेर

मुंबई : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘गट अ’ पदांच्या भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. या भरतीत बिंदू नामावलीत गोंधळ झाल

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
विचारांचा दुष्काळ दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरीची रचना : हभप म्हस्के
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ शक्ती देणारेउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार; प्रीतीसंगमावर केले अभिवादन

मुंबई : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘गट अ’ पदांच्या भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. या भरतीत बिंदू नामावलीत गोंधळ झाल्याचा आरोप करत आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. आरक्षणाच्या नियमांचे पालन झाले नसल्यामुळे मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा त्यांचा दावा आहे.
फेब्रुवारीच्या अखेरीस सुमारे 1440 पदांसाठी जाहीर करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत आरक्षणाच्या टक्केवारीनुसार जागांचे योग्य वाटप झाले नसल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे. अनुसूचित जातींसाठी अपेक्षित प्रमाणात जागा न दर्शविता तुलनेने कमी जागा दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचप्रमाणे अनुसूचित जमातींच्या जागांबाबतही तफावत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. विशेष म्हणजे विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या काही प्रवर्गांसाठी एकही जागा नमूद नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पडळकर यांच्या मते, आरक्षित प्रवर्गातील अनेक उमेदवार गुणवत्ता यादीतून खुल्या प्रवर्गात निवड होऊ शकतात. मात्र प्रशासन अशा उमेदवारांची नोंद आरक्षित जागांमध्येच दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील जागांची संख्या अनावश्यकपणे वाढल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारामुळे आरक्षणाच्या मूलभूत तत्त्वांवर परिणाम होत असल्याची त्यांनी चिंता व्यक्त केली. भरती प्रक्रियेत झालेल्या या कथित त्रुटींमुळे पारदर्शकतेवर प्रश्‍न निर्माण होत असल्याचे सांगत पडळकर यांनी ही प्रक्रिया तात्पुरती थांबवून संपूर्ण तपासणी करण्याची मागणी केली आहे. बिंदू नामावलीची अचूक पडताळणी न करता जाहिराती प्रसिद्ध केल्यास मागासवर्गीयांच्या हक्कांवर गदा येऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या कामकाजावरही त्यांनी टीका केली. काही विभागांमध्ये बिंदू नामावली तपासताना वारंवार चुका होत असल्याचे उदाहरण त्यांनी दिले. सोलापूर जिल्ह्यातील एका तपासणी प्रक्रियेत तीन वेळा त्रुटी आढळल्याचा दावा करत त्यांनी अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणावर प्रश्‍न उपस्थित केले.

जाणीवपूर्वक आरक्षण डावलण्याचा प्रयत्न
आरक्षणासारख्या संवेदनशील विषयाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे सांगत पडळकर यांनी या प्रकरणाची चर्चा विधानसभेत करण्याचा इशाराही दिला. तसेच आरोग्यमंत्री यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात जाणीवपूर्वक चुका करून तरुणांच्या संधींवर परिणाम होत असेल तर संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाकडून या आरोपांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

COMMENTS