सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा गटातील सर्वात मोठ्या गावांपैकी असलेल्या रांजणगाव परिसरात वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे शे

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा गटातील सर्वात मोठ्या गावांपैकी असलेल्या रांजणगाव परिसरात वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे शेतकरी त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर गावचे सरपंच महेश देशमुख यांनी महावितरणकडे पाठपुरावा करत अखंडित वीजपुरवठ्याची मागणी केली असून, यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत अखंडित वीजपुरवठा देण्याचे आश्वासन दिले आहे.
रांजणगाव परिसरात मोठ्या प्रमाणात शेतजमीन ओलिताखाली असून शेतीसाठी वीजपुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अपुरा वीजपुरवठा आणि वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे पिकांना पाणी देताना अडथळे निर्माण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते.
दरम्यान, तालुक्यातील राजकीय बदलानंतर विकासकामांना गती मिळाली असून जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यासाठी विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक सार्वजनिक कामांना वेग आला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याच अनुषंगाने रांजणगाव येथील वीजप्रश्न सोडविण्यासाठी गावचे सरपंच महेश देशमुख यांनी सुपा येथील महावितरणचे विद्युत अभियंता पिसाळ यांची भेट घेऊन निवेदन दिले. गावासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
या मागणीची दखल घेत महावितरणचे विद्युत अभियंता पिसाळ यांनी रांजणगाव पंचक्रोशीतील वीजपुरवठा पुढे खंडित होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यावेळी सरपंच महेश देशमुख, उपसरपंच शिवाजी शिंदे, शरद सरोदे, बाबा जवक, अनिल जवक, बंटी साबळे, भाऊ देशमुख, दत्ता लोणकर, मोहन लोणकर, मनोहर साबळे, उत्तम पवार, नानासाहेब अल्हाट, अभिषेक देशमुख, अनिल गाढवे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS