कर्जत : संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या जयघोषाने कर्जत परिसर दुमदुमून गेला. संत गजानन महाराज यांचा 148 वा प्रकट दिन अत्यंत भक्तिभावपूर्ण व भव

कर्जत : संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या जयघोषाने कर्जत परिसर दुमदुमून गेला. संत गजानन महाराज यांचा 148 वा प्रकट दिन अत्यंत भक्तिभावपूर्ण व भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज व सद्गुरु गोदड महाराज या दोन महान संतांच्या भेटीचा अनोखा व ऐतिहासिक सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.
कर्जत येथील सद्गुरु उद्योग समूहाचे संस्थापक डॉ. शंकर नेवसे व उद्योगसमूहाच्या अध्यक्ष कल्याणी नेवसे यांच्या पुढाकारातून मागील वीस वर्षांपासून संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. सद्गुरु दूध डेअरी येथील श्री गजानन महाराज मंदिरात पहाटे श्रींच्या मूर्तीला महाअभिषेक करण्यात आला.
सकाळी श्रींच्या प्रतिमेची सजवलेल्या रथातून टाळ-मृदंगाच्या निनादात, ढोल-ताशांच्या गजरात संत सद्गुरु श्री गजानन महाराज व संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कल्याणी नेवसे बोलताना म्हणाल्या की, संत गजानन महाराजांचा 148 वा प्रकट दिन साजरा करताना विशेष वैशिष्ट्य म्हणजे संत गजानन महाराजांच्या पादुका या सद्गुरु गोदड महाराज यांच्या दर्शनासाठी कर्जत येथे आणण्यात आल्या. दोन संतांच्या भेटीचा हा अद्भुत सोहळा भाविकांसाठी भावनिक क्षण ठरला. गजानन महाराज व सद्गुरु गोदड महाराज यांनी आमच्या नेवसे कुटुंबीयांकडून अशीच सेवा करून घ्यावी, हीच प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.
संस्थापक अध्यक्ष डॉ. शंकर नेवसे म्हणाले की, “हा सुखसोहळा शब्दात मांडता येणार नाही. सद्गुरूंच्या सेवेमध्ये अपार आनंद मिळतो. गेल्या वीस वर्षांपासून अखंडपणे ही सेवा सुरू असून, दरवर्षी वाढणारा भाविकांचा प्रतिसाद पाहून समाधान वाटते. आमच्या कुटुंबाकडूनही सद्गुरूंची अशीच निःस्वार्थ सेवा घडावी, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.”

COMMENTS