संगमनेर ः परिस्थितीचा बाऊ न करता तिच्यावर मात करा, कारण संकटे आणि अडथळे हे नवीन संधी निर्माण करून देत असतात. कष्टाला पर्याय नसून पर्याय निर्माण क
संगमनेर ः परिस्थितीचा बाऊ न करता तिच्यावर मात करा, कारण संकटे आणि अडथळे हे नवीन संधी निर्माण करून देत असतात. कष्टाला पर्याय नसून पर्याय निर्माण करणे हे यशाचे सूत्र आहे. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने उच्च गुणवत्ता शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना संस्काराची शिदोरी दिली असल्याचे गौरवउद्गार ज्येष्ठ व्याख्याते प्रा नितीन बानगुडे यांनी काढले आहे.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने मेधा सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात यावेळी ते बोलत होते. यावेळी समवेत मुंबई आयआयटीचे संशोधक प्रा. डॉ. क्षितिज जाधव, संस्थेच्या विश्वस्त शरयूताई देशमुख, कॅन्सरतज्ज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, सुधाकर जोशी, नामदेव गायकवाड आदींसह सर्व विभाग प्रमुख व शिक्षक उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा बानगुडे म्हणाले की, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. महाराजांनी अत्यंत कमी कालावधीत स्वराज्याची मोठी क्रांती घडवली. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आणि नियोजन हे त्यांनी केले. त्यांच्या नियोजनाचे कौशल्य प्रत्येकाने अभ्यासा. मात्र तरुण पिढी सध्या मोबाईल मध्ये व्यस्त आहे. यामुळे मोठी नैराश्यता येते.तरुणांनी मैदानावर खेळले पाहिजे. यातून चांगल्या आरोग्याबरोबर चांगली मानसिकता निर्माण होते. संकटे, अडथळे, अपयश याबरोबर सामना केल्याने मोठी संधी निर्माण होते. यशाला शॉर्टकट नाही आणि कष्टाला पर्याय नाही तुमच्यातील कमतरतांना बलस्थाने बनवा. पर्याय निर्माण करणे हीच यशाची खरे सूत्र आहे. असे सांगताना अमृतवाहिनी संस्थेने निर्माण केलेले मेधाचे व्यासपीठ हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मोठे वाव देणारे असून या संस्थेने शिक्षणाबरोबर संस्काराची शिदोरी दिली असल्याचे गौरवोजगार त्यांनी काढले. तर डॉ. क्षितीज जाधव म्हणाले की, स्वतःला वाईट वाटून घेण्याने प्रगती होत नाही. काम करताना चांगल्या वाईट याची परवा करू नका निर्णय घ्या घेतलेल्या निर्णय जे यशस्वी करून दाखवतात तेच इतरांसाठी आदर्श ठरतात. पारंपारिक अभ्यासापेक्षा संशोधनावर अधिक भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले. तर डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, तरुणांनी स्वतःची झोप उडवेल अशी स्वप्न पहा. ते पूर्ण करण्यासाठी सातत्य ग्रामीण भागातच खरी गुणवत्ता असून आगामी काळ हा तरुणांचा आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये पूर्ण आत्मविश्वास आणि क्षमतेने योगदान दिल्यास तुम्हाला यश नक्की मिळेल असे त्या म्हणाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मॉडेल स्कूलची विद्यार्थिनी ईश्वरी विखे हिने केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले यावेळी सर्व विभागांची विद्यार्थी शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रोजेक्टचे प्रदर्शन – अमृतवाहिनी इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध प्रोजेक्टचे प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आले असून हे नवीन उपकरणे व संशोधन नक्कीच कृषी क्रांतीत बदल घडवतील असा विश्वास डॉ. क्षितिज जाधव यांनी व्यक्त केला असून शालेय विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा व ढोल ताशांच्या गजरात केलेल्या स्वागताने पाहुणे भारावले.
COMMENTS