।संगमनेर : संगमनेर तालुक्यातील घारगाव भागातील एका गावात शुक्रवारी (दि. ११) एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती 'उडान हेल्पलाईन' आण
।संगमनेर : संगमनेर तालुक्यातील घारगाव भागातील एका गावात शुक्रवारी (दि. ११) एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती ‘उडान हेल्पलाईन’ आणि सजग नागरिकांकडून मिळाल्यानंतर घारगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन हा बालविवाह रोखण्यात यश मिळवले.
पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
‘स्नेहालय’च्या ‘उडान’ प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत स्थानिक प्रशासन, पंचायत समिती पदाधिकारी व बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर कुटुंबीयांची ‘लग्नाची घाई नाही, मुलगी बालग्राममध्ये सुरक्षित आहे, त्यामुळे गैरसमज झाला आहे,’ अशी भूमिका घेत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कसून तपास केल्यावर बालविवाह होणार असल्याची माहिती समोर आली.
मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आणि बालविवाह कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर, दोन्ही कुटुंबांना ताब्यात घेण्यात आले. दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन करण्यात आले. अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत कोणतीही विवाहबाह्य कृती न करण्याचे त्यांना लेखी हमीपत्र देण्यास सांगण्यात आले. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार जर यापुढे असा प्रयत्न केला गेला तर सर्वजण कारवाईस पात्र ठरतील व त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटीसद्वारे पोलिसांनी संबंधितांना बजावले आहे.
दरम्यान, कुठेही बालविवाह होत असेल तर ‘उडान हेल्पलाईन १०९८’ वर माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
COMMENTS