समीर वानखेडे या नार्कोटीक विभागाच्या अधिकाऱ्याची गेली चाळीस दिवस राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी चे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जी खरडपट्टी काढणं सुरू ठ
समीर वानखेडे या नार्कोटीक विभागाच्या अधिकाऱ्याची गेली चाळीस दिवस राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी चे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जी खरडपट्टी काढणं सुरू ठेवलं, त्यातून राज्याच्या माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनाही त्यांनी घाम फोडला! राज्यातील एखादा अधिकारी ज्या विभागात कार्यरत असेल आणि तेच धंदे तो करित असेल तर कायद्याला अभिप्रेत असणाऱ्या नैतिकतेत बसते का, हा खरा कळीचा प्रश्न आहे. चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून म्हणजे सेलिब्रिटी असणाऱ्या नटनट्यांना आपल्या कार्यालयात बोलावून स्वतः केलेली हिरोगिरी समीर वानखेडेंना अवघ्या काही दिवसांत लोकांच्या नजरेतून उतरल्याने गमवावी लागली आहे. परंतु, आज आपला चर्चेचा मुद्दा हा नाही, तर वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी याप्रकरणात अचानक उडी घेतल्याने काही प्रश्न उपस्थित होतात. समीर वानखेडे यांचा खरा वादग्रस्त प्रश्न पुढे आला तो म्हणजे जात आणि धर्माचा. जात म्हणजे जन्म असा भाषिक अर्थ आहे. समीर वानखेडे यांचा जन्म कोणत्या जातीत झाला हा आता संशोधनाचा विषय आहे. अर्थात कोणाची जात काय आहे, हे शोधणे नैतिकदृष्ट्या अयोग्य कायदेशीरदृष्ट्या चूक किंवा गुन्हा आहे. असे असले तरी संपूर्ण महाराष्ट्र आज समीर वानखेडे ला विचारतो आहे ” तुही जात कंची?”उत्तर महाराष्ट्रातील एका कवीने लिहीलेल्या कवितेची सुरुवात ज्या ओळीने होते त्या ओळींची आज प्रकर्षाने आठवण येते की, ” गर्भाचा निरोप घेतल्यापास्न अख्ख्या जगाचा एकच लकडा, तुही जात कंची?” जात विचारणे हा देखील गुन्हा असताना समीर वानखेडे यांच्या जातीचा शोध सर्रास सुरू आहे, याचे मुख्य दोन कारणे. एक तर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अनुसूचित जाती या प्रवर्गाचा फायदा घेतला आहे. जात ही जन्माने चिकटते, त्यामुळे तिचा फायदा घेणारा हा त्या जातप्रवर्गाचे प्रतिनिधित्व करतो. परंतु, ज्या प्रवर्गातून तो प्रतिनिधित्व करतो त्या प्रवर्गाशी त्याचा कोणताही जन्मसिद्ध हक्क ठरण्याची पात्रताच नसेल तर त्या व्यक्तीला सेवेतून बाद करायला हवे त्याचबरोबर त्याने शासन आणि समाज अशा दोन्हींची फसवणूक केल्याप्रकरणी वेगळे गुन्हे देखील दाखल व्हायला हवे! नवाब मलिक यांनी समीर वानखेडे प्रकरण जवळपास इथपर्यंत खेचून आणल्याचे दिसत असतानाच अचानक या प्रकरणी ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी एन्ट्री घेतली. त्यांची एन्ट्री ही वानखेडे चा बचाव करणारी असल्याचेच त्यांच्या एकूण वक्तव्यावरुन स्पष्ट होते. बाळासाहेब हे चळवळीचं अढळ स्थान असल्याने अनुसूचित जाती या प्रवर्गातून अडचणीत येणारा एखादा अधिकारी शेवटी बाळासाहेब यांच्या आश्रयाला येईल, यात वावगे असे काहीच नाही. कारण बाळासाहेब आंबेडकर हे राजकीय पेक्षा सामाजिक पातळीवर अधिक जवळीकता असणारे नेतृत्व म्हणून जवळचे वाटतात. मात्र, याप्रकरणात बाळासाहेब यांनी देखील केवळ न्यायालयीन निवाडा यात जाऊन थेट समीर वानखेडे ला क्लिनचीट देण्याच्या भूमिकेपेक्षा असे काही समीर व्यवस्थेत लपलेले आहेत का, त्यांना शोधून काढायचा प्रयत्न करायला हवा. समीर चा अर्थ हवेचा झुळूक असा होत असला तरी हवा वाहत असलेल्या दिशेने वाहत जाणारे अनेक समीर लपून असतात. ड्रग्ज प्रकरणात स्वयंघोषित हिरो झालेल्या समीर यांची आतापर्यंत उघड झालेल्या बाबीतून सत्य आणि त्याहीपेक्षा नैतिकता झळकताना दिसत नाही! हवा समीरच्या दिशेने असेपर्यंत समीर समाजाचा प्रतिनिधी वाटणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत होता. हवा पलटली अन् समीर मिळेल त्यादिशेने आपली सुरक्षितता शोधतोय. अशा संधीतून नैतिकदृष्ट्या अंध:पतन झालेल्या आणि कायद्याचा दुरोपयोग करणारा समीर खरेतर स्वतःच्या हिरोगिरीतून आणि संघ-भाजपच्या वापर करण्याच्या रणनितीतून या स्तरावर पोहचल्याने अशा व्यक्तिला संरक्षित करणे खचितच योग्य नाही!
COMMENTS