रस्ते कामाच्या दर्जावर तीव्र आक्षेप घेत दर्जा सुधारण्याची मागणीश्रीगोंदा ःमहाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एम.एस.आय.डी.सी.) या शासकीय यंत्

रस्ते कामाच्या दर्जावर तीव्र आक्षेप घेत दर्जा सुधारण्याची मागणी
श्रीगोंदा ःमहाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एम.एस.आय.डी.सी.) या शासकीय यंत्रणेमार्फत श्रीगोंदा शहरात सुरू असलेल्या रस्ते कामाच्या दर्जाबाबत गंभीर तक्रारी समोर येत असून, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज सोमवार, 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी साडेदहा वाजता तहसील कार्यालयासमोर प्रतीकात्मक दशक्रिया आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती ब्रिगेडच्या पदाधिकार्यांनी दिली.
शहरातील अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असून, नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदने देऊनही ठोस कारवाई न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले. आंदोलनकर्त्यांनी केलेल्या प्रमुख मागणीमध्ये एमआयडीसीमार्फत सुरू असलेली रस्ते कामे दर्जेदार व नियमांनुसार करण्यात यावीत.शहरातील रस्त्यांच्या कडेला साईड गटारांची व्यवस्था करून पावसाचे व सांडपाण्याचे पाणी रस्त्यावर साचणार नाही, याची खबरदारी घ्यावी. नागरिकांना सुरक्षितपणे पायी चालता यावे यासाठी सर्व ठिकाणी पदपथ (फुटपाथ) उभारावेत. रस्त्यातील सांडपाणी चेंबरची दुरुस्ती करून योग्य निचर्याची सोय करावी. तसेच गॅस व पाणीपुरवठा नळवाहिन्या नियोजनबद्ध पद्धतीने टाकून भविष्यात पुन्हा रस्ते खोदावे लागू नयेत, याची दक्षता घ्यावी. ठेकेदारांनी मंजूर अंदाजपत्रकानुसार (इस्टिमेटप्रमाणे) ठरलेल्या कालावधीत दर्जेदार काम पूर्ण करावे, आदी मागण्या केल्या आहेत. संभाजी ब्रिगेडने पुढे नमूद केले की, दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी श्रीगोंद्याचे ग्रामदैवत शेख महंमद बाबा यांची यात्रा असून, या यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या विविध भागांतून लाखो भाविक शहरात दाखल होतात. रस्त्यांची अवस्था सुधारली नाही, तर भाविकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात्रेपूर्वी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासन व संबंधित ठेकेदारांकडून ठोस व लेखी आश्वासन मिळेपर्यंत हे प्रतीकात्मक दशक्रिया आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार असले, तरीही प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास पुढील टप्प्यात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असेही संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

COMMENTS