राजकारणात लहान भाऊ आणि मोठा भाऊ ही संकल्पना, महाराष्ट्रातच उदयाला आली. शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रात एक आक्रमक हिंदुत्ववादी पक्ष असताना, त्यांच्या
राजकारणात लहान भाऊ आणि मोठा भाऊ ही संकल्पना, महाराष्ट्रातच उदयाला आली. शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रात एक आक्रमक हिंदुत्ववादी पक्ष असताना, त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाने युती केली होती. ही बाब आपणास सगळ्यांना ज्ञात आहे. ही युती सलग २५ वर्ष चालत राहिली. मध्यंतरी १९९५ मध्ये युतीची, पूर्ण पाच वर्षाची सत्ताही महाराष्ट्रात आली. त्या पाच वर्षात मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेला मिळाले. त्यातील चार वर्षे मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते, तर सहा महिने नारायण राणे! अर्थात, नारायण राणे यांना शेवटचं वर्ष मिळालं होतं. परंतु, अति आत्मविश्वासामुळे निवडणुकांना सामोरे जाऊन पुन्हा बहुमत प्राप्त करून पूर्णवेळ मुख्यमंत्रीपद मिळवावं अशी महत्त्वकांक्षा कदाचित सेनेमध्ये किंबहुना नारायण राणे यांच्यामध्ये त्याकाळी आली असावी! याच काळात शिवसेनेचा आधार घेत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने आपली ताकद वाढवत राहून ती बऱ्याच मोठ्या प्रमाणात उभी केली. महाराष्ट्रात १९९५ मध्ये जी सत्ता युतीला मिळाली, त्यावेळीही महाराष्ट्रात मोठा भाऊ शिवसेना आणि लहान भाऊ भारतीय जनता पक्ष असं समीकरण राहिलं. परंतु, २०१४ मध्ये या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या. तरी त्यांनी एकमेकांना निवडणूक काळात साथ दिली. परंतु, जशीही मतमोजणी पूर्ण झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मध्येच आपलं तुणतुणं वाजवत भारतीय जनता पक्षाला आपण विनाशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये पहिले निर्णायक द्वंद्व त्यांनी निर्माण केले. यातून भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. काही महिने राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा असल्यामुळे, त्यांचं सरकार सुरळीत चाललं होतं. अर्थात, बहुमत सिद्ध करताना आवाजी मतदानाने ते घेण्यात आलं होतं. अगदी गोंधळातच आवाजी मतदानाने बहुमत पारित झाले. परंतु, त्यानंतर अस्वस्थ झालेली शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील मतभेद त्यानंतरच्या काळात वाढत गेले. परंतु, पुन्हा शिवसेना आणि त्यांची दिल जमाई झाली आणि युतीचे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे सरकार अस्तित्वात आले. अर्थात, यावेळी भारतीय जनता पक्षाच्या जागा जास्त असल्यामुळे मुख्यमंत्रीपद त्यांना मिळाले आणि शिवसेनेला काही महत्त्वाची खाती मिळाली. पाच वर्ष या युतीचे सरकार स्थिरस्थावर पद्धतीने चालले असले तरी, त्यांच्या अंतर्गत मतभेद वाढत होते. यादरम्यानच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे ज्या ज्या वेळी मंत्रालयात गेले, त्या त्या वेळी फडणवीस यांनी त्यांना दीर्घकाळ प्रतीक्षा करण्यास भाग पाडले. या सगळ्या प्रकारातून अस्वस्थ होत गेलेले उद्धव ठाकरे यांनी तात्काळ प्रतिक्रिया न देता, ती गोष्ट मनात ठेवली आणि त्यांच्या मनातील ही सल २०१९ च्या निवडणुकीच्या निकालानंतर ती खदखदू लागली. यावेळी त्यांनी जाहीर केलं की मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेला मिळावं. अर्थात यावर मोठ्या प्रमाणात खल झाला आणि शिवसेनेची भाजपा बरोबर युती न होता आतून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर त्यांच्या बोलण्या चालू राहून महाविकास आघाडीचे अगदी धक्का तंत्र देऊन सरकार अस्तित्वात आले. ही बाब भारतीय जनता पक्षाच्या मनात सल निर्माण करणारी ठरली. त्याचा सूड अडीच वर्षानंतर कसा घेण्यात आला, हे आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. इथपर्यंत हा वर्तमान इतिहास आहे. परंतु, महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष हा वाढीस लागला तो केवळ शिवसेनेमुळे नव्हे, तर, काँग्रेस अंतर्गत असलेल्या मतभेदातून. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचेही मतभेद कारणीभूत आहेत. विलासराव देशमुख यांना पाडण्यासाठी आतून शरद पवारांनी जसे प्रयत्न केले, तसेच प्रयत्न शरद पवार यांच्या विरोधात करताना विलासराव देशमुख यांनी भारतीय जनता पक्षांच्या उमेदवारांच्या मागे आतून आपली ताकद उभी केली. त्यात गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे आणि इतर काही नेत्यांचा निषेध समावेश आहे. हा समावेश कसा आहे याचा उहापोह उद्याच्या दखलमध्ये आपण पाहूया!
COMMENTS