कर्जत : तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने कर्जत पोलिसांनी मंगळवारी (दि.१७ मार्च) महात

कर्जत : तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने कर्जत पोलिसांनी मंगळवारी (दि.१७ मार्च) महात्मा फुले चौकात अचानक नाकाबंदी करून धडाकेबाज कारवाई केली. दुपारी २ ते सायंकाळी ५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल ११७ वाहनचालकांवर विविध नियमभंगांबाबत गुन्हे दाखल करण्यात आले.
या कारवाईत भारतीय न्याय संहिता कलम २८५ अंतर्गत ४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तसेच विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा, विनापरवाना वाहन चालविणे, हेल्मेटचा अभाव, तसेच परवाना जवळ न बाळगणे अशा विविध प्रकारच्या नियमभंगांवर कठोर कारवाई करण्यात आली. या सर्व प्रकरणांमधून एकूण १ लाख ९९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
विशेष म्हणजे चार चाकी वाहन चालकांनी काळया काचा केल्या होत्या त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली, विना नंबर प्लेट असलेल्या १६ मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या असून, यामुळे नियमभंग करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण लोखंडे, कर्जत उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्या आदेशाने पार पडली. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण सुतार, राजेंद्र थोरात, किरण बारवकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोल्हे, मनोज मुरकुटे, अमोल रायकर, अर्जुन पोकळे यांच्यासह होमगार्ड तापकीर, कांबळे, सोलंकर, मिंड, येडे, बोबडे, देवकाते, पिसे, जगदाळे यांनी सहभाग घेतला.
कर्जत पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना चांगलाच इशारा मिळाला असून, नागरिकांनी नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

COMMENTS