Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रस्त्यांची डागडुजी!

भावी जिल्हा परिषद सदस्यांचा संधीसाधूपणा उघड; डांबर न वापरता रस्ताकाम; ग्रामस्थांनी काम पाडले बंद-डॉ.गणेश ढवळेबीड । प्रतिनिधीग्रामीण भागातील खड्डेम

तीन महिने मंत्रिमंडळ निवडणूक रणांगणात; नांदेडकरांच्या प्रश्नांना कोण देणार उत्तर?
प्रभाग चारमध्ये काँग्रेस-वंचित आघाडीच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद; विजयाची चिन्हे स्पष्ट
मुंबईत सत्ता कोण राखणार ?

भावी जिल्हा परिषद सदस्यांचा संधीसाधूपणा उघड; डांबर न वापरता रस्ताकाम; ग्रामस्थांनी काम पाडले बंद-डॉ.गणेश ढवळे
बीड । प्रतिनिधी
ग्रामीण भागातील खड्डेमय रस्त्यांमुळे दुचाकीस्वार घसरून पडून अपघात होत असताना, नागरिकांचे जीव जात असताना आणि पावसाळ्यात शालेय विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागत असताना ग्रामस्थांनी दिलेली निवेदने, लेखी तक्रारी व आंदोलने संबंधित भावी जिल्हा परिषद सदस्यांनी सातत्याने दुर्लक्षित केली होती. मात्र आता जिल्हा परिषद निवडणूक जवळ येताच अचानक रस्त्यांची तात्पुरती डागडुजी सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
काही ठिकाणी खड्ड्यांवर माती टाकणे, खडी पसरवणे, नाममात्र डांबरीकरण करणे तर काही ठिकाणी स्वखर्चाने रस्ता केला असे गाजावाजा करत फोटो-व्हिडीओ सोशल मीडिया व स्थानिक वृत्तपत्रांत झळकू लागले आहेत. मात्र हा खरा विकास नसून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली दिखाऊ मलमपट्टी असल्याचा घणाघाती आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केला आहे. निवडणूक नसती तर हे रस्ते तसेच खड्डेमय राहिले असते. अपघातात माणसं गेली, अनेकजण जखमी झाले, तरी कुणालाही जाग आली नाही. आता मतांसाठी अचानक प्रेम उफाळून आले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया डॉ. ढवळे यांनी दिली. ही डागडुजी तात्पुरती असून पावसाळा आला की परिस्थिती पुन्हा जैसे थे होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. केवळ निवडणूकपुरते नव्हे तर दीर्घकालीन, दर्जेदार व टिकाऊ रस्ते बांधकाम व्हावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
महाजनवाडी ग्रामस्थांनी निकृष्ट रस्ताकाम अडवले
बीड तालुक्यातील बालाघाटावरील चौसाळा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग मांजरसुंभा-पाटोदा-महाजनवाडी-बोरखेड या रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू असून सुमारे 10 लाख रुपये खर्चाचे अंदाजे 800 मीटर खडी-डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. विशेष म्हणजे रस्त्याच्या कामात डांबरच न वापरता केवळ खडी टाकून काम केले जात असल्याचे निदर्शनास येताच संतप्त ग्रामस्थांनी रस्ताकाम तात्काळ बंद पाडले. यावेळी कंत्राटदाराने आपली चूक कबूल करत रस्त्यावरील खडी बाजूला काढून पुन्हा डांबर टाकून योग्य पद्धतीने काम करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच ग्रामस्थांनी काम सुरू करण्यास परवानगी दिली. या वेळी सचिन घरत, गौतम घरत, कृष्णा घरत, संतोष शिंदे, पिंटू घरत, दादाहरी घरत आदी ग्रामस्थ उपस्थित होते. एकंदरीतच जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या रस्ते दुरुस्तीमुळे विकासापेक्षा भावी लोकप्रतिनिधींचा संधीसाधूपणाच अधिक उघड होत असल्याची चर्चा सध्या गावोगावी रंगू लागली आहे.

COMMENTS