नांदेड ःकाही क्षण असे असतात की, ते काळाच्या प्रवाहात विरघळत नाहीत ते आठवणींच्या गाभार्यात कायमचे दीपवून राहतात. नांदेडच्या पवित्र तख्त सचखंड श्री

नांदेड ःकाही क्षण असे असतात की, ते काळाच्या प्रवाहात विरघळत नाहीत ते आठवणींच्या गाभार्यात कायमचे दीपवून राहतात. नांदेडच्या पवित्र तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराच्या सुवर्णमय परिसरात, श्रद्धेच्या शांततेत केशरी पगडी परिधान करून चालणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांच्याकडून सहजपणे उमटलेली आपुलकीची हाक हा असाच एक क्षण होता. हिंद-दी-चादर शहीदी समागमाच्या निमित्ताने अवघ्या तीनच दिवसांपूर्वी अजितदादा पवार नांदेडला येऊन गेले होते. गुरुद्वारा बोर्डतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला होता. डोक्यावर केशरी पगडी, चेहर्यावर शांत तेज आणि पावलांमध्ये नम्रतेचा भाव श्रद्धेच्या मार्गावर चालताना छायाचित्रकार महेश होकर्णे यांनी सहज हाक दिली –
दादा
क्षणभर थांबून, चालत-चालतच अजितदादांनी दिलेले उत्तर आज नांदेडकरांच्या मनात घुमते आहे –
काय रे, कसा आहेस? पगडी बरोबर बसली ना, तो क्षण केवळ एका कॅमेर्यात कैद झालेला नव्हता. तो माणुसकीचा, आपुलकीचा आणि संवेदनशील नेतृत्वाचा जिवंत दस्तऐवज होता. मोठ्या पदावर असलेला नेता, पण मनाने साधा माणूस – हीच ओळख त्या एका वाक्यातून उमटली होती. आज मात्र बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी येताच, नांदेडवर शोककळा पसरली आहे. तीन दिवसांपूर्वी ज्या शहरात त्यांनी श्रद्धेने नतमस्तक होऊन दर्शन घेतले, त्या नांदेडमध्ये आज त्यांच्या आठवणींना अश्रूंचा ओलावा लाभतो आहे. केशरी पगडीतील ती चालती प्रतिमा, तो हसरा प्रश्न, तो अनौपचारिक संवाद आता प्रत्यक्षात नाही, पण स्मृतींच्या फ्रेममध्ये कायमचा जिवंत आहे. छायाचित्रकारासाठी तो एक अविस्मरणीय क्षण होता, तर नांदेडकरांसाठी तो आपल्या दादाच्या माणुसकीचा पुरावा ठरला.
राज्याचे उपमुख्यमंत्री असतानाही अजितदादांनी कधीच अंतर निर्माण केले नाही. प्रत्येकाशी थेट संवाद, साधेपणा आणि आपुलकी हीच त्यांची खरी ओळख होती. म्हणूनच त्यांच्या जाण्याने केवळ एक नेता हरपलेला नाही, तर नांदेडकरांनी आपला हक्काचा माणूस गमावला आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
केशरी पगडी, आपुलकीची हाक आणि अचानक आलेली शांतता –
हीच आज नांदेडच्या मनात खोलवर रुतून बसलेली वेदना आहे.
अजितदादा पवार यांना छायाचित्रकार होकर्णे बंधूंसह संपूर्ण नांदेडकरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
अजितदादांचे आणि नांदेडचे नाते केवळ औपचारिक राजकीय भेटीपुरते मर्यादित नव्हते, तर ते आत्मीयतेच्या धाग्यांनी विणलेले होते. नांदेडच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. सिंचन, रस्ते, आरोग्य, शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्रांतील प्रश्नांवर नांदेडचा आवाज थेट मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याचे काम अजितदादांनी सातत्याने केले. नांदेडच्या दौर्यावर असताना ते केवळ कार्यक्रमापुरते थांबत नसत, तर स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि सामान्य नागरिकांशी संवाद साधत, त्यांच्या अडचणी ऐकत आणि तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देत. त्यांच्या भेटीत औपचारिकतेपेक्षा आपुलकी अधिक जाणवत असे. म्हणूनच नांदेडकरांना ते दिलदार दादा म्हणून परिचित होते. आज त्यांच्या जाण्याने नांदेडने केवळ एक प्रभावी नेतृत्व गमावलेले नाही, तर आपल्या सुख-दुःखात सहभागी होणारा एक आपला माणूस हरपलेला आहे.

COMMENTS