पुणे : महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांतील मिळकतींनाही कर आकारणी सुरू झाल्याने या गावातील निवासी मिळकतींना मिळकतकरातील 40 टक्क्यांची स

पुणे : महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांतील मिळकतींनाही कर आकारणी सुरू झाल्याने या गावातील निवासी मिळकतींना मिळकतकरातील 40 टक्क्यांची सवलत योजना लागू करण्यात आली आहे. त्यासाठी समाविष्ट गावातील मिळकतधारकांना सवलतीसाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
दरम्यान, महापालिकेने यापूर्वीच शहराच्या जुन्या हद्दीसाठी या योजनेला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. समाविष्ट गावातील मिळकतींच्या नोंदी ठेवण्याची प्रक्रिया महापालिका प्रसासनाकडून सुरू करण्यात आली आहे. मांजरी, वाघोली, सूस-म्हाळुंगे, बावधन आदी भागात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून येथील मिळकतींची संख्याही अन्य गावांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे येथील मिळकतींच्या नोंदी ठेवण्याच्या कामाला विलंब होत असून ग्रामपंचायतीकडे असलेल्या नोंदीनुसार मिळकतींची महापालिकेच्या नियमानुसार कर निश्चिती केली जात आहे. त्यासाठी मिळकत शोधून त्याला नोटीस दिली जात असून सुनावणी घेण्यात येत आहे. समाविष्ट गावातील मिळकतींना टप्प्याटप्प्याने कर आकारणी केली जाणार असून त्यांनाही मिळकतकरातील 40 टक्क्यांची सवलत लागू करण्यात आली आहे. त्यासाठी येथील मिळकतधारकांना पीटी-3 अर्ज भरावा लागणार आहे. मात्र कर निश्चितीची प्रक्रिया सुरू असल्याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. समाविष्ट गावात एकूण 2 लाख 934 मिळकती असून, निवासी मिळकतींची संख्या 1 लाख 82 हजार 164 एवढी असून, 14 हजार 351 व्यावसायिक मिळकती आहेत. मिश्र वापराच्या 3 हजार 719 मिळकतींची नोंद महापालिका प्रशासनाकडे आहे.
COMMENTS