मुंबई : कायम सेवेत समायोजन करावे, या मुख्य मागणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेले सुमारे 30 हजार कंत्र

मुंबई : कायम सेवेत समायोजन करावे, या मुख्य मागणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेले सुमारे 30 हजार कंत्राटी कर्मचार्यांनी 25 ऑक्टोबरपासून विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारपासून मुंबईतील आझाद मैदानात दोन दिवस राज्यस्तरीय आंदोलन पुकारण्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागात 2007 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत विविध प्रवर्गांत कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्यात आली आहे. अनेक कर्मचारी 10 ते 15 वर्षांहून अधिक कालावधीपासून काम करत आहेत. कंत्राटी स्वरुपात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचार्यांची परीक्षा, मुलाखत अशा विहित पद्धतीने निवड करण्यात आली आहे. सध्या राज्यभरात 40 हजारांहून अधिक जागा रिक्त असून या रिक्तपदी एनएचएमअंतर्गत काम करत असलेल्या कर्मचार्यांचे समायोजन करावे, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. 2009 पासून कंत्राटी कर्मचारी संवैधानिक मार्गाने आपल्या विविध मागण्या मांडत आहेत. देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, ओडीसा, गोवा, मणिपूर या राज्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचार्यांना समान वेतनश्रेणी, रजा अधिनियम, नियत निवृत्तीपर्यंत सेवा हमी अशा प्रकारच्या सुविधा लागू केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या प्रश्नी लक्ष घालून कंत्राटी कर्मचार्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलक कर्मचार्यांकडून करण्यात येत आहे.
COMMENTS