बीड : पवित्र रमजान ईद सणाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत राजयोग फाउंडेशन आणि आश्रय सेवा केंद्र व पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय

बीड : पवित्र रमजान ईद सणाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत राजयोग फाउंडेशन आणि आश्रय सेवा केंद्र व पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीय बांधवांना ‘रमजान मुबारक किट’ देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. समाजातील प्रत्येक घटकाला सणाचा आनंद मिळावा आणि सर्वसमावेशकतेचा संदेश समाजात पोहोचावा या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
बीड येथील समर्थ राजयोगच्या मुख्य कार्यालयात बुधवार दिनांक 18 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजता राजयोग फाउंडेशन यांच्या पुढाकारातून आश्रय सेवा केंद्र आणि पत्रकार संघ यांच्या संकल्पनेतून ईद मुबारक किट वाटपाचा स्तुत्य उपक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी राजकीय फाउंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक शुभम धूत, पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी,आश्रय सेवा केंद्राच्या अध्यक्षा शेख आयेशा यांच्यासह नवगण शिक्षण संस्थेचे संचालक आमेर सिद्धिकी, डॉ.वैभव कोठेकर, राजदिप धुत, सागर वाहुळ, मेघराज जगदाळे, सुशांत राऊत, संकेत करवा, वैभव घुमरे, सय्यद ताहेर, राहुल बादाडे, अभिजीत आव्हाड, ओंकार बोबडे यांच्यासह राजयोग फाऊंडेशनचे इतर सदस्य उपस्थित होते. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अनेकदा दूर राहणार्या तृतीयपंथीय बांधवांनाही सणाचा आनंद साजरा करता यावा, त्यांना आपुलकीची जाणीव व्हावी आणि समाजात समानतेचा संदेश जावा, या उद्देशाने या किटचे वितरण करण्यात आले असे मुख्य आयोजक राजयोग फाउंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक शुभम धूत यांनी स्पष्ट केले. तर रमजान आणि ईद हा संयम, दया, प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देणारा सण आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने आणि आत्मीयतेने वागणूक देणे हीच खरी मानवता असल्याचे पत्रकार वैभव स्वामी यांनी नमूद केले. राजयोग फाउंडेशन आणि आश्रय सेवा केंद्र व पत्रकार संघ यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे तृतीयपंथीय बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. समाजात समता, आपुलकी आणि परस्पर सहकार्य वाढविणार्या या उपक्रमाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले. रमजान ईदच्या पवित्र पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम समाजात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा आदर्श उपक्रम ठरत आहे.

COMMENTS