Homeताज्या बातम्याराजकारण

राज ठाकरे यांचे तुणतुणे !

महाराष्ट्र इतका समृद्ध आहे की, कुणालाच आरक्षणाची गरज नाही, असं म्हणणारे मनसे नेते राज ठाकरे यांना खऱ्या अर्थाने, महाराष्ट्राची जाण नाही, असं म्हण

उच्चभ्रू शेतकरी जातींच्या मग्रुरीला नरेंद्र मोदी यांनी ठेचून काढले! 
न्यायपालिकेचे खडेबोल!
बंद आणि बंदचा विरोधाभास !

महाराष्ट्र इतका समृद्ध आहे की, कुणालाच आरक्षणाची गरज नाही, असं म्हणणारे मनसे नेते राज ठाकरे यांना खऱ्या अर्थाने, महाराष्ट्राची जाण नाही, असं म्हणणं अधिक संयुक्तिक ठरेल. हिरूनफिरून भाषा आणि प्रांतवादाची भूमिका घेणारे राज ठाकरे हे महाराष्ट्रातील गंभीर राजकीय नेते म्हणून गणले जात नाही. एकेकाळी, तरूणांना स्फूर्तिदायक वाटणारं हे नेतृत्व आज काळाच्या संदर्भांना समजू न शकल्याने, एकूण राजकीय पटलावर मागे पडले आहेत. महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची भाषा करणारे राज ठाकरे यांच्याकडे कधी महाविकास आघाडी, तर, कधी महायुती ‘वोट-कटाऊ’ पार्टी म्हणून वापर करायला सरसावतात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत ‘लाव-रे-तो व्हिडिओ’ म्हणत सभा गाजवत होते. लाव-रे-तो व्हिडिओ, हे वाक्य त्याकाळात महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी हे वाक्य रूळले होते. मात्र, आख्या देशाने भाजप’ला सत्तेच्या बहुमतापासून रोखण्याचा निर्णय घेतला त्याकाळात म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे मात्र भाजपशी युतीत राहीले. अर्थात, युती सोबत राहुन त्यांना एकही जागा लोकसभेची देण्यात आली नाही. त्यामुळे, त्यांच्या पक्षाला किती मते मिळाली याचा अंदाज त्यांनाही नाही. पण, आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशेच्या वर जागा लढविण्याची भाषा त्यांनी केली. अर्थात, इथपर्यंत त्यांनी काय काय केले त्याच्याशी आम्हाला कोणतेही घेणेदेणे नाही; परंतु, महाराष्ट्रात कोणालाच आरक्षणाची गरज नाही, असं त्यांच विधान एससी, एसटी, ओबीसी यांची दिशाभूल करणारे आहे. हे समुह देशातील आणि राज्यातील बहुसंख्यक समुह आहेत. परंतु, यांना काही मिळायला लागलं की, राज ठाकरे यांचे राजकारण जातीच्या भोवती फिरत राहते. अर्थात, महाराष्ट्राच्या राजकारणात जातीचे राजकारण १९९९ पासून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उदयापासून सुरू झाल्याचा आरोप त्यांनी अनेकवेळा केला. परंतु, कधीकाळी एकत्रित शिवसेनेच्या राजकारणात संघटक नेते म्हणून वावरणारे ठाकरे यांना सर्वाधिक बळ जर कोणाकडून मिळाले असेल तर ते म्हणजे ओबीसी समाजाकडून. मात्र, ओबीसी समाजाला नेतृत्व स्थान देण्यास ते कधीच धजावले नाहीत. आता, ओबीसी समुदाय राजकीयदृष्ट्या जागृत होत असताना आणि आपल्या आरक्षणाला वाचवण्यासाठी स्वतः ओबीसी समाज नेतृत्व करित असताना, त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्याऐवजी ‘आरक्षणाची महाराष्ट्रात गरज नाही ‘, असं म्हणत धुराळा उठवण्यात धन्य मानणारे राज ठाकरे म्हणूनच एक नेतृत्व म्हणून कधीच व्यापक होऊ शकलेले नाहीत.  महाराष्ट्राची परंपरा ही परिवर्तनाच्या वैचारिक अधिष्ठानाची आहे. हे अधिष्ठान इतके मजबूत आहे की, उध्दव ठाकरे यांनी त्या वैचारिक अधिष्ठानाला स्विकारताच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाला गवसणी घातली. सध्या, सत्तेत असलेली महायुती या वैचारिक अधिष्ठानापासून लांब असल्याने त्यांची सत्ता अधांतरी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार तर आहेच, परंतु, उध्दव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीने फुले-शाह-आंबेडकरी विचारधारा स्विकारल्याने ते पुन्हा सत्तेला गवसणी घालण्याच्या दिशेने आगेकूच करित असल्याचे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाले. राज ठाकरे मात्र राजकारणाच्या निर्णायक स्थितीत कुठेच ठाम नाहीत. त्यामुळे, वोट कटाऊ पार्टी म्हणून त्यांचा वापर करायचे शिंदे – फडणवीस – पवार यांच्या महायुतीने ठरवले आहे. राज ठाकरे यांचा वापर करू इच्छिणाऱ्या शक्तीच राजकीयदृष्ट्या कोमात आहेत, तर, तेथे राज ठाकरेंचा निभाव काय लागेल! पण, ठिक आहे ज्यांचे ज्यात समाधान असते, तसे परिणाम त्यांना प्राप्त होतात, एवढेच! खरेतर, राज ठाकरे यांची अवस्था तुणतुणे सारखी झाली; कोणीही असा तुणतुणे वाजवीत बसा!

COMMENTS