मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक न लढता थेट महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला होता. तसेच मधल्या काळात भाजप नेते देवें

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक न लढता थेट महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला होता. तसेच मधल्या काळात भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत सातत्याने होत असल्यामुळे मनसे विधानसभा निवडणुकीत महायुतीचा घटक होईल अशी अपेक्षा होती, मात्र मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुरूवारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. किमान 225 ते 250 जागा मनसे लढेल, असे देखील त्यांनी जाहीर केले. त्यामुळे आगामी निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकसभेनंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महाविकास आघाडी व महायुती या दोन प्रमुख आघाड्यांनी तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीने समन्वय समितीही स्थापन केली आहे. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्षही तयारीला लागला आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईत झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. राज्यातील राजकीय परिस्थिती विचित्र आहे. कोण कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही. येत्या निवडणुकीत ह्या सगळ्या राजकीय पक्षात जे काही घमासान होणार आहे, ते न भूतो भविष्यती असेल, असे ते म्हणाले. मात्र, महाराष्ट्राचे प्रश्न हेच आपल्या पक्षाचे प्रचाराचे मुद्दे असतील, असं राज ठाकरे यांनी सांगितले. आपल्या पक्षातील एक-दोन पदाधिकारी दुसर्या पक्षात जाणार आहेत असे मला कळले. अशा लोकांनी जावे म्हणून मी स्वत: लाल गालिचा घालेन. ज्यांना स्वत:च्या भविष्याचा सत्यानाश करून घ्यायचा असेल त्यांंनी खुशाल जावे. मुळात त्या पक्षांचेच स्थिर नाही तर तुम्हाला काय मिळणार, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
COMMENTS