कर्जत ः शाळेतील मुलीला त्रास देत असल्याची तक्रार दाखल करून घेऊ नका, असे म्हणत पोलीस कर्मचार्याची गचांडी पकडून दुसर्या पोलिस कर्मचार्यास ढकलून

कर्जत ः शाळेतील मुलीला त्रास देत असल्याची तक्रार दाखल करून घेऊ नका, असे म्हणत पोलीस कर्मचार्याची गचांडी पकडून दुसर्या पोलिस कर्मचार्यास ढकलून जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार राशीन पोलीस दुरक्षेत्र येथे घडला. यावेळी बापलेकाने पोलिसांना शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल नितीन धस यांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, शाळेतील एक विद्यार्थिनी शाळेत येता-जाताना एकजण त्रास देत असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी शिक्षकासमवेत राशीन पोलीस दुरक्षेत्र येथे आली. यावेळी शिक्षकाने मुलीची आई तसेच त्रास देत असलेला नितीन पप्पू पवार याला बोलावले. दरम्यान नितीन पवार व त्याचे वडील पप्पू मगर पवार, रा. पवारवाडी, ता. कर्जत हे तेथे आले. फिर्याद देण्याचे काम सुरु असतानाच त्या दोघांनी मोठमोठ्याने आरडाओरड केली. दारुच्या नशेत असलेल्या पप्पू पवार व मुलगा यांनी मुलगी व तिच्या आईस शिवीगाळ केली. नितीन पवार याने तुम्ही तक्रार दिली तर मी आत्महत्या करेल अशी धमकी दिली. दरम्यान पोलीस त्यांना शांत राहण्याच्या सूचना देत होते. मात्र त्यांनी ते ऐकून न घेता पोलिसांना तुम्ही तक्रार घ्यायची नाही असे म्हणत शासकीय गणवेशात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल नितीन धस यांनी गचांडी धरली. त्यांना सोडवण्यासाठी दुरक्षेत्र पोलीस अंमलदार संभाजी वाबळे व पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे हे पुढे गेले. त्यावेळी नितीन पवार याने वाबळे यांना ढकलून दिले. यामध्ये वाबळे यांच्या डाव्या हाताच्या बोटास दुखापत झाली. त्यानंतर बापलेकांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली व पोलीस दुरक्षेत्रातून निघून गेले. याप्रकरणी दोघांविरुद्ध कलम 186, 332, 337, 34, 353, 504, 506, 510, 85 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. संबंधित विद्यार्थिनीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS