Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात पावसाचा हाहाकार

राज्यभर पावसाचा धुमाकूळ ; पुणे, पालघर, ठाण्यात शाळांना सुटी

मुंबई/पुणे ः राज्यभरातील विविध जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेले पाऊस गुरूवारी सकाळी देखील सुरूच होता. विशेष म्हणजे पुणे शहर आणि जिल्ह्या

अखेर ‘किसन वीर’ कारखान्याच्या गव्हाणीत पडली मोळी
महागाईबद्दल मोदींनी जनतेची माफी मागावी : थोरात
महादजी शिंदे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

मुंबई/पुणे ः राज्यभरातील विविध जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेले पाऊस गुरूवारी सकाळी देखील सुरूच होता. विशेष म्हणजे पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाने हाहाकार घातला असून, शाळांना सुटी देण्यात आली आहे. तसेच मुंबईसह कोकणात देखील पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, पुणे, रायगड व सिंधुदुर्गसह बहुतांश जिल्ह्यांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने पुढील काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात रेड अलर्ट अर्थात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी या भागातील शाळांना सुटी घोषित केली आहे. त्याचबरोबर पुणे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातदेखील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पुण्यातील पुरस्थितीचा आढावा घेतला आहे. अजित पवार पुण्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागात दाखल झाले. त्यांनी यावेळी अधिकार्‍यांशी फोनवरून चर्चा देखील केली. पुणे महानगरपालिका येथे अधिकार्‍यांकडून मदत व बचत कार्याचा आढावा घेतला. नैसर्गिक संकटात सर्व यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे मदत कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांकडून धरणातील पाणी साठ्याची माहिती घेतली व पावसाची स्थिती लक्षात घेऊन विसर्ग करण्याच्या  सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पुरामुळे प्रभावित भागातील नागरिकांना अन्न व पाणी देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत. 48 तास धोकादायक पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांनी अशा ठिकाणी जाऊ नये असेही त्यांनी म्हटले आहे. लवासा येथे दरड कोसळल्याने मदत कार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रशासन सतर्क राहून काम करीत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्याचा खर्च महानगरपालिका व शासनातर्फे करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. वेगवेगळ्या भागात एनडीआर एफच्या तुकड्या तैनात केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आंबील ओढा भागातही खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री पवारांनी घेतला बचावकार्याचा आढावा – यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, पाणी सोडायचे असेल तर आत्ताच काही प्रमाणात सोडा. रात्री उशिरा पाण्याचा विसर्ग सुरू करू नये अशा सूचना यावेळी दिल्या आहे. नदीत सोडणारे पाणी कॅनलमध्ये  सोडण्यात येईल त्यामुळे खडकवासला धरणातील विसर्ग कमी केला जाणार आहे. ज्या धरणात आणखी पाणी साठवण्याची क्षमता आहे त्या धरणात, कालव्यात पाणी सोडावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत. पुण्यातील सिंहगड परिसरातील एकतानगर परिसरात बचावकार्य करण्यात आले आहे. लष्कराचे जवान आणि एनडीआरएफचे पथक त्या ठिकाणी पोहोचले आहेत. पुर परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी तातडीने बचावकार्य केले जाईल त्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे. पुढील दोन दिवस पर्यटनस्थळी जाऊ नका, घराबाहेर पडू नका, काळजी घ्या असे आवाहन अजित पवारांनी केले आहे.

पुण्यात पावसाचे 3 बळी शॉक लागून मृत्यू – पुण्यामध्ये गुरुवारी पावसाने तीन बळी घेतले आहे. विजेचा शॉक लागून या तिघांचा मृत्यू झाला आहे. भिडे ब्रिज परिसरातील झेड ब्रिज खालील अंडा भुर्जीचा स्टॉल असून, जवळच नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने अंडा भुर्जीच्या स्टॉलवर काम करणारे तीन इसम अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता गेले. यावेळी त्यांना विजेचा शॉक लागला. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचारांती डॉक्टरांनी गुरूवारी पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान त्यांना मयत घोषित केले आहे. मृत व्यक्तींची नावे समोर आली आहेत. अभिषेक अजय घाणेकर (वय वर्ष 25) आणि आकाश विनायक माने (वय वर्ष 21) हे डेक्कन वाडीचे रहिवाशी आहेत. तर शिवा जिदबहादुर परिहार (वय वर्ष 18) हा नेपाळी कामगार आहे.

खडकवासलातून पाणी सोडल्याने पुणे जलमय – मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा पाण्याच्या विसर्ग वाढवण्यात आला, यामुळे मुठा नदी पात्र देखील दुधडी भरून वाहत आहे. मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. एकता नगर परिसरातील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. तर पुण्यातील रस्ते जलमय झाल्याचे दिसून येत आहे.

शहरातील पूल गेले पाण्याखाली – पुणे महानगर पालिका हद्दीत बालेवाडी पूल, मुळा नदी पूल, संगम रोड पूल, होळकर पूल, संगमवाडी पूल, महर्षी शिंदे पूल, हडपसर- मुंढवा रोड पूल, मातंग पूल, येरवडा शांतीनगर येथील पूल, निंबजनगर पूल, मोई, व चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पुल पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत.

मुंबईला पुढील 24 तासांचा रेड अलर्ट – मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  काही ठिकाणी अत्याधिक मुसळधार पावसाची शक्यताही हवाान विभागाने वर्तवली आहे. तर, अधूनमधून 60-70 किमी ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यावेळी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 27 अंश सेल्सियस ते 24 अंश सेल्सियसच्या आसपास असेल.

लवासा सिटीत दरड कोसळली – मुसळधार पावसामुळे मुळशी तालुक्यातील सुप्रसिद्ध लवासा प्रकल्पात दरड कोसळून 2 व्हिला जमिनीखाली गाडले गेलेत. त्यात 3 ते 4 जण बेपत्ता झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. बेपत्ता नागरिकांचा स्थानिकांच्या मदतीने शोध घेतला जात आहे. मुळशी तालुक्यातील लवासा येथे गुरुवारी 453.5 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे डोंगररांगातून वाहणार्‍या पावसाच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. या पावसामुळे लवासा हिल स्टेशन परिसरात डोंगरावरील दरड कोसळून त्यातील 2 व्हिला अर्थात बंगले गाडले गेलेत. या बंगल्यात 3 ते 4 जण राहत होते.

COMMENTS