पुणे : शहरातील सर्व प्रकारच्या व्यावसायिक वाहनांसाठी दरवर्षी तंदुरुस्ती प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असतानाही प्रत्यक्षात चाचणी प्रक्रियाच ठप्प झाल्याने म
पुणे : शहरातील सर्व प्रकारच्या व्यावसायिक वाहनांसाठी दरवर्षी तंदुरुस्ती प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असतानाही प्रत्यक्षात चाचणी प्रक्रियाच ठप्प झाल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. जड, मध्यम तसेच हलक्या प्रवासी व मालवाहू वाहनांसाठी हे प्रमाणपत्र अनिवार्य आहे; मात्र स्वयंचलित वाहन चाचणी केंद्रे वेळेवर कार्यान्वित न झाल्यामुळे पुणे विभागात वाहन तपासणीची संपूर्ण यंत्रणाच विस्कळीत झाली आहे.
केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 12 सप्टेंबर 2023 रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार व्यावसायिक वाहनांची तंदुरुस्ती तपासणी केवळ स्वयंचलित केंद्रांवरच करण्याची अट घालण्यात आली होती. या निर्णयामागे तपासणी प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि मानकांनुसार व्हावी हा उद्देश होता. मात्र अधिसूचना प्रसिद्ध होऊन सुमारे अडीच वर्षे उलटूनही पुणे प्रादेशिक परिवहन विभागात असे केंद्र सुरू झालेले नाही, ही बाब चिंताजनक ठरत आहे. चाचणी केंद्र कार्यान्वित नसल्याने हजारो वाहने तंदुरुस्ती प्रमाणपत्रांशिवाय रस्त्यावर धावत असल्याचे चित्र आहे. ही स्थिती केवळ कायदेशीर अडचणी निर्माण करणारी नाही, तर सार्वजनिक सुरक्षेच्याही दृष्टीने धोकादायक मानली जात आहे. तांत्रिक तपासणी न झालेल्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, 1 फेब्रुवारीपासून वाहन तपासणीसाठी आगाऊ नोंदणीची सुविधा बंद करण्यात आली आहे. परिणामी राज्य परिवहनच्या बस, पुणे महानगर परिवहन मंडळाच्या बस, रिक्षा तसेच हलकी व जड मालवाहू वाहने तंदुरुस्ती प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत अडकून पडली आहेत. अनेक वाहनधारकांना रोजच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार आहे.

COMMENTS