कोणत्याही देशाच्या, राज्याच्या विकासाला गती द्यायची असेल तर, प्रथम त्या देशात, राज्यात पायाभूत सोयी-सुविधांसह रस्त्यांचे दळण-वळणांचे जाळे असायला

कोणत्याही देशाच्या, राज्याच्या विकासाला गती द्यायची असेल तर, प्रथम त्या देशात, राज्यात पायाभूत सोयी-सुविधांसह रस्त्यांचे दळण-वळणांचे जाळे असायला हवे. भारताचा विचार करता, केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी आणलेल्या लॉजिस्टिक धोरणामुळे मालवाहतूक सुलभ होण्यासाठी, आणि मालवाहतुकीवर जीडीपीमध्ये होणारा खर्च हा 10-13 टक्क्यांच्या आसपास आहे. हा खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकार रस्त्यांसह दळण-वळणांच्या सुविधा प्रभावीपणे निर्माण करण्यासाठी उपाययोजना आखत आहे. मात्र अलीकडच्या काही वर्षांत वेगवान रस्ते हे मृत्यूचे महामार्गा बनतांना दिसून येत आहे. महाराष्ट्रात नुकताच खुला करण्यात आलेला समृद्धी महामार्ग हा नागपूर-शिर्डीपर्यंत खुला झाला आहे. तर शिर्डीपासून मुंबईपर्यंत काम सुरु आहे. मात्र हा महामार्ग खुला झाल्यापासून आतापर्यंत या महामार्गांवर होणार्या अपघातांची संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ झालेल्या अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील एकाच कुटुंबांतील 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
विशेष म्हणजे अपघात होऊन 45 मिनिटांचा कालावधी लोटल्यानंतर या कुटुंबाला मदत मिळाल्याचे समोर आले आहे. जर या कुटुंबाला लवकर मदत मिळाली असती तर अनेकांचे जीव वाचले असते. त्यामुळे एकीकडे वेगवान प्रवास तर दुसरीकडे होणारे अपघात आणि त्यातून वाढत जाणारी मृत्यूची संख्या यामुळे समृद्धी महामार्ग मृत्यूचा महामार्ग बनत चालल्याचे दिसून येत आहे. विरोधकांनी याप्रश्नी विधिमंडळात देखील आवाज उठवला आहे. मात्र वाढते अपघात रोखण्याची गरज आहे. कारण अपघातांमुळे होणार्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही समृद्धी महामार्गावरील अपघातचा मुद्दा गांभीर्याने घेण्याची मागणी केली. नेहमी काही ठिकाणी अपघात का होतात, याची तपासणी करण्याची मागणी केली. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार असल्याची माहिती दिली. वास्तविक पाहता या महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून ते आतापर्यंत अपघातांची संख्या नेहमी चढतीच राहिली आहे. नागपूर आणि शिर्डी दरम्यानचा समृद्धी महामार्ग हा सरळ महामार्ग आहे. पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी हा महामार्ग सुरू करण्यात आला आहे. महामार्ग वाहतुकीस खुला झाल्यापासून गेल्या 40 दिवसात या महामार्गावर जवळपास 65 अपघात झाले. एकट्या बुलढाणा जिल्ह्यात 23 अपघात झाले आहेत. त्यामुळे हा महामार्ग समृद्धी ऐवजी अपघातांची मालिका घेऊन आला की काय असे चित्र उभे राहिले आणि त्यामुळे प्रशासनही हादरले आहे.
अनेक कारणांमुळे समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता परिवहन विभाग आणि एमएसआरडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने वाहन चालकांवर जनजागृती करणे, टायर फुठून अपघात होऊ नये म्हणून प्रत्येक पेट्रोल पंपावर टायरमध्ये नायट्रोजन भरण्याची व्यवस्था करणे, अशा अनेक उपाय योजना आता प्रत्यक्ष समृद्धी महामार्गावर उतरून परिवहन विभागाचे अधिकारी करत आहेत. याबरोबरच टायर इंडिकेटर डेमो, रोड हिप्नॉसिस डेमो आणि वेगवेगळ्या इलेमेंटचे डेमो देण्यात येणार आहेत. महामार्गाच्या आजूबाजूला कुठेही हॉटेल्स किंवा ढाबा नसल्याने आता अनेक ठिकाणी अनधिकृतरित्या छोटे-छोटे फूड स्टॉल आणि टपर्या आजूबाजूच्या गावातील लोकांनी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महामार्गाच्या बाजूला मोठे ट्रक आणि वाहने थांबताना दिसत आहेत. यामुळे सुद्धा अपघात वाढले आहेत. त्यामुळे परिवहन विभागाचे पोलिस आणि एमएसआरडीसीने या अनाधिकृत स्टॉल्सवर कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक ठिकाणी अशा अनधिकृत फुल स्टॉलमुळे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महामार्गावर नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी वाहनधारकांनी पुढे येण्याची गरज असून, प्रशासनाने देखील प्रभावीपणे यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज आहे, तरच अपघातांची मालिका रोखता येईल.
COMMENTS