बीड प्रतिनिधी - जिल्हा परिषदेतील शिक्षकांना देण्यात येणारे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीचे प्रस्ताव तब्बल वर्षभरापासून प्रलंबित असून जिल्हा परिषदेत प
बीड प्रतिनिधी – जिल्हा परिषदेतील शिक्षकांना देण्यात येणारे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीचे प्रस्ताव तब्बल वर्षभरापासून प्रलंबित असून जिल्हा परिषदेत प्रस्ताव धूळ खात पडून आहे. याबाबत जि.प. प्रशासन उदासीन दिसत आहे. वेतन श्रेणीचे प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढून पात्र शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीचा लाभ देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष माजेद अहमद यांनी आपले सरकार पोर्टलला ऑनलाईन तक्रार करून केली आहे.
शिक्षकांची सेवा बारा आणि चोवीस वर्षे पूर्ण झाल्यावर यांना वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीचे लाभ देण्यात येते मात्र वेळोवेळी सतत पाठपुरावा करून देखील सदर वेतन श्रेणीचे प्रकरणे निकाली काढण्यात आलेले नाही. यामुळे जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना सदरील वेतन श्रेणीच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. यापूर्वी देखील संघटनेद्वारे विनाविलंब वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्याबाबत अनेकदा निवेदन करण्यात आले होते. तसेच यासाठी संघटनेकडून तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जिल्हा परिषदेने सदर प्रश्न निकाली काढण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र याबाबत दिरंगाई केली जात असल्याने शिक्षकांमधून नाराजी व्यक्त केली जात असून जर वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी चे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात आले नाही तर महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा जिल्हाध्यक्ष माजेद अहेमद यांनी आपले सरकार वेब पोर्टल च्या माध्यमातून पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.
COMMENTS