Homeताज्या बातम्यासंपादकीय

वचननामा आणि पूर्ती

आश्‍वासनांची खैरात करायची आणि ती राबवण्याची वेळ आली की, वेळ मारून न्यायची असा अनुभव अनेकांना आला असेल. आश्‍वासने ऐकण्याची सर्वांना सवय झाली आहे,

मुंबई महापालिका विजयाचे गणित
दुष्काळाच्या झळा आणि पाणीटंचाई
महायुतीमध्ये जागावाटपावरून ठिणगी

आश्‍वासनांची खैरात करायची आणि ती राबवण्याची वेळ आली की, वेळ मारून न्यायची असा अनुभव अनेकांना आला असेल. आश्‍वासने ऐकण्याची सर्वांना सवय झाली आहे, मात्र त्याची पूर्ती काही होतांना दिसून येत नाही. खरंतर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने, सत्ताधारी भाजप, काँगे्रस, यासोबतच महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादीसह, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आपले जाहीरनामे जाहीर केले. त्यात अनेक भरघोस आश्‍वासने देण्यात आली आहेत. मात्र गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जे निवडून आलेे, त्यांनी त्यावेळी जो जाहिरनामा जाहीर केला होता, त्याची प्रत्येक वचनाची पूर्ती झाली का, याचा विचार करण्याची गरज आहे. आजच्या मतदारांनी सर्वच पक्षांचे जाहीरनामे सांभाळून ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर सत्तेवर आलेल्या पक्षांकडून कोणती आश्‍वासने देण्यात आली होती, आणि त्यातील किती पूर्ण झाली आणि किती आश्‍वासने हवेतच विरली याचा शोध घेण्याची खरी गरज आहे. हल्लीच्या काळात उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशीच गत विविध राजकीय पक्षांची होतांना दिसून येत आहे. काहीही आश्‍वासने देण्यात येत आहे, मात्र ती पूर्णत्वास कशी जाईल, यासाठी या राजकीय पक्षांकडे कोणताही आराखडा नाही. महिलांना लखपती करणार आहात तर, मग लखपती करण्यासाठी कुठून पैसा उभारणार आहात, याचे कोणतेही उत्तर कोणत्याच पक्षाकडे नाही. त्यामुळे केवळ वचननामा जाहीर करायचा, सत्तेत आलो तर, काही योजना जाहीर करायच्या, आणि त्यातील काही जणांना लाभ द्यायचा, आणि त्या योजना गुंडाळ्याच्या असेच चित्र आजपर्यंत दिसून येत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकर्‍यांचे प्रश्‍न तसेच प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. मात्र ते सोडवण्यासाठी कुठलेही धोरण आखण्यात आलेले नाही. भाजपने आपल्या कार्यकाळात अनेक आश्‍वासने दिली, त्याची किती पूर्तता केली, याचा कोणताही लेखाजोखा मतदारांसमोर मांडलेला नाही. तर दुसरीकडे काँगे्रसने अनेक योजना राबवू असा दावा केला असला तरी, त्यासाठी अर्थपुरवठा कसा उभा करणार, याचे कोणतेही गणित काँगे्रसने मांडलेले नाही. तर दुसरीकडे शेतकर्‍यांना कर्ज आणि ‘जीएसटी’मुक्त करण्याचे प्रमुख आश्‍वासन देत ‘शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा स्वतंत्र वचननामा जाहीर केला. मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा फंडा वापरण्यात येत असला तरी, सत्तेवर आल्यानंतर त्याची पूर्तता होत नाही, हा मतदारांचा अनुभव आहे. वास्तविक पाहता निवडणुका आणि आश्‍वासन यांचे एक अतूट नाते असले तरी, निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्‍वासनांचे पुढे काय होते, हा मोठा यक्षप्रश्‍न आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथम झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ते आतापर्यंत तब्बल 17 लोकसभा निवडणूका पूर्ण झाल्या असून 18 व्या लोकसभेची निवडणूक होत आहे. मात्र यापूर्वी राजकीय पक्षांनी दिलेल्या आश्‍वासन पूर्ण झाले का हा संशोधनाचा विषय आहे. देशात सध्या लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरु झाली आहे. लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांनी आपल्या-आपल्या पक्ष श्रेष्ठींना विनवण्यांसह दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार काही पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांनी निवडणूक लढवताना प्रचाराचे मुद्दे निश्‍चित केले आहेत. त्यानुसारच पक्षाने दिलेल्या सुचनेनुसारच संभाव्य उमेदवार प्रचार करणार आहेत. काही पक्षाच्या नेत्यांसह काही पक्षाचे उमेदवार आपल्या-आपल्या स्टाईलमध्ये लोकांमध्ये मिळण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार प्रचाराच्या जाहिरनाम्यामध्ये धक्कादायक घोषणा करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र त्याची पूर्तता होत नाही, आणि त्या पूर्ण झाल्या नाही म्हणून मतदार आक्रोश करत नाही, हा भारतीय मतदारांचा विसराळूपणाच म्हणावा लागेज. 

COMMENTS