जालना ः मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणावर गदा येणार नाही, याचे लेखी आश्वासन देण्याच्या मागणीसाठी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी
जालना ः मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणावर गदा येणार नाही, याचे लेखी आश्वासन देण्याच्या मागणीसाठी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र होत असतांना दुसरीकडे ओबीसी बांधव देखील आपल्या आरक्षणावर गदा येत असल्याचे दिसताच आक्रमक झाले आहे. मात्र लक्ष्मण हाके यांचे आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी बुधवारी राज्य सरकारवर केला आहे.
ओबीसी आंदोलनाची धग वाढत असल्याचे दिसून येत आहे. प्रा. लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर मनोज जरांगे यांनी जोरदार टीका केली आहे. ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आापण आंदोलन सोडणार नसल्याचे देखील मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितले. एकाही तरूणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नका, अशी विनंती देखील मनोज जरांगे यांनी केली आहे. यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला आपला विरोध नसल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांचे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे. या आधीचे आंदोलन आणि आताचे आंदोलन पाहिले की हे लक्ष्यात येते. आंदोलनाला एवढी गर्दी कशी होत आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सरकार मुद्दाम हे घडवून आणत असल्याचेही जरांगे यांनी म्हटले आहे. धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी नुकतेच मराठा आरक्षणाचा प्रश्न केवळ केंद्र सरकारच सोडवू शकते असे विधान केले होते. मनोज जरांगे यांनी त्यांच्या या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कदाचित ओम राजेनिंबाळकर यांना काही माहिती नसेल. मराठ्यांनी ओबीसीमधून (कुणबी जातप्रमाणपत्रासह) आरक्षणाची मागणी केली आहे. याचा अर्थ आम्हाला 50 टक्क्यांच्या आतच आरक्षण हवे आहे आणि आम्ही ही मागणी लावून धरली आहे. त्यामुळे कुणीही यात विनाकारण मुसळ घालू नये. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी बोलायचे असेल तर नीट बोला, अन्यथा बोलूच नका असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
COMMENTS