कोपरगाव ः के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या विज्ञान शाखा व भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. बापूसाहेब भोसले यांना इंडियन फिजिक्स असोसिएशनच्या (पुणे
कोपरगाव ः के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या विज्ञान शाखा व भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. बापूसाहेब भोसले यांना इंडियन फिजिक्स असोसिएशनच्या (पुणे विभाग) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी दिला जाणारा अतिशय प्रतिष्ठेचा ’डॉ. भास्कर राय पुरस्कार उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार : 2024’ ज्येष्ठ पत्रकार व प्रसिद्ध विचारवंत संजय आवटे यांच्या शुभहस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षक दिनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे प्रदान करण्यात आला, अशी माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. व्ही. सी. ठाणगे यांनी येथे दिली.
पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, रोख रक्कम रुपये 5000/- आणि प्रमाणपत्र असे होते. प्रा. भोसले यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव अॅड. संजीव कुलकर्णी व विश्वस्त संदीपराव रोहमारे, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे आदींनी अभिनंदन केले आहे. प्रा. भोसलेंना हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाच्या लौकिकात मोठी भर पडली आहे, असेही संस्थेचे मान्यवर पदाधिकारी म्हणाले. प्रा. भोसले गेल्या 32 वर्षांपासून सोमैया महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ते संशोधन मार्गदर्शक असून त्यांचे भौतिकशास्त्राशी संबंधित अनेक ग्रंथ आणि 29 शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केलेली असून आठ विद्यार्थी संशोधन करीत आहेत. त्यांच्या विभागातील एका विद्यार्थिनीला सुवर्णपदक तसेच अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
COMMENTS