Homeताज्या बातम्यासंपादकीय

प्रविणदादांची अभिनंदनीय भूमिका!

छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा शाक्तराज्याभिषेक शतकोत्तर च्या काही दिवसांपूर्वीच राज्यातील चिंतनशील आणि परिवर्तनवादी मराठा नेते प्रवीणदादा गायकव

पर्यावरण संवर्धन जनजागृती सायकल महारॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद : मनोहर शिंदे
दिगंबरा..दिगंबरा श्रीपाद वल्लभ..दिगंबरा..चा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी करत देवगड दत्त मंदिर भाविकांसाठी खुले
मराठा तरुणांना नक्षलवादी होऊ देऊ नका : नरेंद्र पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा शाक्तराज्याभिषेक शतकोत्तर च्या काही दिवसांपूर्वीच राज्यातील चिंतनशील आणि परिवर्तनवादी मराठा नेते प्रवीणदादा गायकवाड यांनी ज्या पद्धतीने मराठा आणि एकूणच आरक्षणावर आपली भूमिका मांडली, त्या भूमिकेचे आम्ही सर्वप्रथम स्वागत करतो. दिवंगत न्यायमूर्ती पी बी सावंत यांचा दाखला देत, प्रवीणदादा गायकवाड यांनी जर खुल्या वर्गाला आरक्षण मिळालं तर, आरक्षणाच औचित्य संपून जाईल, असं म्हटले आहे. ज्या समाज घटकापासून राज्याच्या जनतेला संरक्षण हवं, तिच जनता जेव्हा आरक्षण मागायला लागते; तेव्हा, त्या आरक्षणाचं महत्त्व समूळ नष्ट होतं. प्रवीणदादा गायकवाड यांचे हे वैचारिक महत्त्व निश्चितपणे महाराष्ट्र धर्म अधोरेखित करणारे आहे. सर्व आरक्षणधारी वर्गामध्ये सध्या जो ताणतणाव निर्माण झालेला आहे, त्यातून निवडक आणि आपल्या दृष्टीने परिवर्तन म्हणजे काय या दिशेने जाणं, ते सर्व घटकांसाठी महत्त्वाचे आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी ‘विद्याविना मती गेली, मती विना गती, गतिविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले’, या वचनाच्या अनुषंगाने प्रवीणदादा गायकवाड हे बोललेले आहेत. त्यांच्या मते राज्यातील शिक्षणाचं एकूण ध्येयधोरण सरकारने जर बदललं, तर, या सगळ्या प्रक्रियेमध्ये बदल होतील. लोकांना चांगल्या दर्जाचे शिक्षण दिलं तर, जवळपास सर्व प्रश्न सुटतील, असं त्यांचं प्रतिपादन महात्मा फुलेंच्या या विचारांचा पूर्वसूरी म्हणून स्वीकार करणारे आहे. यामध्ये कुठलीही शंका नाही. बहुजन समाजाचं जे काही वाटोळं होतं, ते शिक्षणाच्या अभावामुळेच होतं. सध्या शिक्षण एवढं महाग केलं गेलं आहे की, सर्वसामान्य माणसाला ते घेणं अवघड आणि अशक्य होत चाललं आहे. जगातल्या आणि देशातल्या भांडवलदारी संस्थांच्याकडे शिक्षणाचे अधिकार दिल्यामुळे शिक्षण ही विक्री होणारी वस्तू बनली आहे. ज्यांची आर्थिक क्षमता असेल ते, ती विकत घेतील आणि आपले जीवन घडवतील. त्यामुळे, प्रवीण दादा गायकवाड यांनी नुसता आरक्षणावर प्रहार केला आहे, असं नव्हे; तर, त्यांनी एकंदरीतच व्यवस्थेमध्ये काय चुकत आहे, त्यावर नेमकेपणाने आणि अचूकतेने बोट ठेवलेले आहे. त्यांच्या या भूमिकेचे समाजाने स्वागत करायला हवे आणि विशेषतः महाराष्ट्रातील सर्व समाज घटकांनी या भूमिकेला उचलून धरलं पाहिजे. कारण, मानवी समाज हा अनेक घटकांनी बनलेला आहे. परंतु, तो विचार आणि भावना या दोन घटकांवर विशेष पुढे जात असतो. त्यामुळे, या दोन्ही घटकांना जर आपण विचारात घेतलं तर, निश्चितपणे मानवी समाज हा विकासाच्या एकूण टप्प्यावर पुढे जात असतो. परंतु, मानव समाज पुढे जात असताना त्या समाज व्यवस्थेत एकमेकांचा सन्मान आणि शांतता राहणं, ही पूर्व अट आहे.  ही पूर्व अट शिक्षणाशिवाय त्याची पूर्तता होऊ शकत नाही. हे काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे, प्रवीणदादा गायकवाड यांनी अचूकपणे हे विश्लेषण टिपलेले आहे. त्यांच्या या विश्लेषणाला वैचारिक आधार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना ते पूर्वसूरी म्हणून स्वीकारत आहेत.  हा स्वीकार त्यांनी आपल्या विचारांमध्ये व्यक्त केलेला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना मराठा समाजातच हल्ल्याला समोर जावं लागलं होतं; परंतु, पुन्हा ते त्याच वैचारिक दमाने समाजात उभे राहिलेले आहेत. आपल्या भूमिकेत त्यांनी मात्र तसूभरही बदल न करता, आपली परिवर्तनवादी भूमिका आक्रमकपणे आणि समंजसपणे परंतु तितक्याच वैचारिकतेने पुढे नेण्याची भूमिका स्वीकारलेली आहे. त्यांच्या या भूमिकेबद्दल अभिनंदनच करायला हवे!

COMMENTS