Homeताज्या बातम्यासंपादकीय

निवडणूकोत्तर सर्वपक्षीय मराठा सत्ता?

- भाग २ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर, सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवार याद्यांची जवळपास घोषणा केली आहे. या याद्यांवरून एक नजर जर

अनुयायी बाळासाहेबांची तर्कशुद्धता स्विकारतील!
त्रिकोणी प्रदेशातील राजकीय रस्सीखेच !
पवारांचे तळ्यात – मळ्यात का ?

– भाग २

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर, सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवार याद्यांची जवळपास घोषणा केली आहे. या याद्यांवरून एक नजर जर आपण फिरवली तर, एक गोष्ट प्रकर्षाने आपल्या लक्षात येते की, सर्वच पक्षांच्या याद्यांमध्ये मराठा उमेदवारांचे प्राबल्य आहे. निवडणुका झाल्यानंतर निकाल घोषित झाल्यापासून सरकार स्थापनेसाठी अवघा दोन दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे कोणत्याही आघाडीला सरकार स्थापन करणे हे कठीण असणार; परंतु, यावर तोडगा सर्वपक्षीय मराठा नेतृत्वाने अंतर्गत पातळीवर काढलेला असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होते आहे, आणि ती अशी की, सर्व पक्षातील मराठा आमदारांनी एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करावं! त्यामुळे सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी तयार करताना तो उमेदवार त्या मतदार संघातून जिंकेलच या इर्षेने बनवलेली आहे. त्याच अनुषंगाने बारामती मतदारसंघाकडे जरी आपण पाहिलं तर, अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार ही लढाई देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गटांनी प्रतिष्ठेची केली आहे.  कोणताही आमदार जरी निवडला, जो आमदार निवडेल ज्या आघाडीतला, त्या आघाडीच्या सत्ता स्थापनेचा दावा अधिक मजबूत होईल, अशी संभावना चर्चिली जात आहे. अर्थात, या निवडणुका राजकीय पक्ष जरी लढत असले तरीही, या निवडणुका खास करून मराठा राजकारणावर आधारलेल्या मोठ्या प्रमाणात असणार आहेत. ज्यांना आपण  महाराष्ट्राचे परंपरागत सत्ताधारी म्हणतो-मानतो, तोच समाज समूह पुन्हा सत्तास्थानी येण्याची बाब अधिक बळकट झाली आहे. हे आता नाकारता येत नाही. हा निवडणूक पूर्व अंदाज असला तरी यामध्ये, अंतर्गत राजकारणाचा मोठा भाग समाविष्ट आहे, अशी चर्चा आता राजकीय निरीक्षक असणाऱ्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा प्रकारचे राजकारण झाले तर संवैधानिक लोकशाहीला जातीचा विळखा बसेल आणि हा जातीचा विळखा कोणत्याही राजकीय पक्षाला सहजासहजी काढून टाकणे किंवा दूर करणे शक्य होणार नाही. ओबीसींच राजकारण किंवा ओबीसींचा राजकीय पक्ष अजूनही महाराष्ट्राच्या भूमीवर नाही. काही नेते निश्चितपणे दावा करत आहेत. ओबीसी आघाडी किंवा ओबीसी बहुजन आघाडी. परंतु, प्रत्यक्षात त्यांचे फिल्डवर कोणतेही काम नाही. एक जातीय राजकारण सोडले तर, त्यांच्याकडे कोणताही ओबीसी समुदाय नाही. त्यामुळे, ओबीसींच राजकारण करण्याचा दावा करणारे हे सगळे नेते, ओबीसींची फसवणूक करीत आहेत. ओबीसींच समग्र नेतृत्व म्हणून ते पुढे येत नाहीत. तेही आपापल्या एकेका जातीला घेऊन राजकारणात प्रयोग करत आहेत. हा प्रयोग सुरुवातीलाच अयशस्वी ठरणारा प्रयोग आहे. यामध्ये आम्हाला शंका नाही. शिवाय, या प्रयोगामध्ये निश्चितपणे इतर घटक पक्ष जरी सामील होणार असले तरी, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल करणे पर्यंतची ताकद त्यांची नाही. उपद्रव मूल्य देखील नाही. त्यामुळे ते केवळ राजकीय निवडणुकांमध्ये आपली हजेरी लावणार. या पलीकडे त्यांच्या आघाड्यांचा कोणताही विचार राजकीय निवडणुकांमध्ये होऊ शकत नाही. ओबीसी राजकारण उभे करायचे असेल तर, खऱ्या अर्थानं सर्व जात समूहांच्या किंवा ओबीसी घटक जातींचा समावेश करूनच तो राजकीय पक्ष पुढे गेला पाहिजे. परंतु, ही बाब कोणताही राजकीय नेता करताना दिसत नाही. त्यामुळे, महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण निर्माण झालं असतानाही, मराठा राजकारण पुढे सरकण्याची अधिक संभावना आहे. ही संभावना सर्वपक्षीय मराठा आमदारांची मिळून सत्ता स्थापनेपर्यंत जाऊ शकेल. इथपर्यंत राजकीय चर्चा महाराष्ट्राच्या भूमीवर होत आहे. या चर्चेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे, महाराष्ट्रात आगामी निवडणुका नंतर कोणत्याही एका राजकीय पक्षाची किंवा आघाडीची सत्ता न राहता ती जवळपास सर्वपक्षीय सत्ता आघाडी होती की काय, असे वातावरण महाराष्ट्रात निर्माण झाले आहे.

COMMENTS