मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीत भरभरून मते मिळवत सर्वाधिक यश मिळवणार्या महाविकास आघाडीला मात्र विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवता आले नाही. त्
मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीत भरभरून मते मिळवत सर्वाधिक यश मिळवणार्या महाविकास आघाडीला मात्र विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवता आले नाही. त्यानंतर आजमितीस महाविकास आघाडीत एकला चलो रे चे सूर आळवतांना सर्वच पक्ष दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट अटळ असल्याचे बोलले जात आहे.
महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोक्यावर असतांना महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून एकमेकांवर चिखलफेक करण्यात येत आहे. त्यामुळे ही चिखलफेक स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठीच सुरू असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निकालानंतर एकही बैठक राज्यस्तरावर महाविकास आघाडीची झाली नाही. त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये बिघाडीचे संकेत दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा मुद्दा असू द्यात किंवा मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याचा विषय असो, विधानसभेवेळी बैठकांमध्ये कधीच एकमत झाले नाही. त्यामुळे पक्षांना आणि संभाव्य उमेदवारांना तयारी करण्यास पुरेसा वेळ मिळू शकला नाही. त्यातच निकालानंतर आत्मपरीक्षण करण्यासाठी एकही संयुक्त बैठक घेतली नाही. प्रत्येक पक्ष आपलं वैयक्तिक चिंतन आणि बैठका घेत आहे. त्यात ठाकरेंची शिवसेना आगामी महापालिका निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा देत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची एकजूट आणि समन्वय निकालानंतर कुठे दिसत नसल्याचे दिसून येत आहे. ज्यांनी महाविकास आघाडीची मूठ बांधली, वज्रमुठ घट्ट केली, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा नाराज असल्याची माहिती आहे. एकमेकांच्या चुका आता जाहीरपणे बोलून दाखवणार्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आणि एकूणच आघाडीमध्ये समन्वय नसल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाने याआधीच मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.
काँगे्रस सरळ होईना, ठाकरे गट झोपेतून उठेना : डॉ. कोल्हे
काँगे्रस पक्षाची मोडलेली पाठ अजूनही सरळ होण्याची चिन्हे नाहीत, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही, अशा शेलक्या शब्दात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना घरचा आहेर दिला. राज्यात मित्र पक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठा स्पेस आहे. तर पराभव हा आधी मनात होतो आणि त्यानंतर रणांगणांत होतो. त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा. तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत. लक्षात ठेवा. बचेंगे तो और भी लढेंगे म्हणत त्यांनी घटक पक्षांमध्ये जोश निर्माण करण्याचाही प्रयत्न केला.
स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्यावे : वडेट्टीवार
खासदार अमोल कोल्हे यांनी स्वतःच्या पक्षाकडे अधिक लक्ष द्यावे आणि आम्हाला जरा कमी सल्ला द्यावा, अशा खोचक शब्दात त्यांनी अमोल कोल्हे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. राज्यातील सरकार हे काही जनतेने निवडून दिलेले सरकार नाही. तर घोळ करून आलेले सरकार असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
COMMENTS