मुंबई ः बदलापूर येथील अत्याचार घटनेने पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले. लाडक्या बहिणींना देण्यात येणारे पैसे नको, तर आम्हाला सुरक्षा द्या अशी मागणी
मुंबई ः बदलापूर येथील अत्याचार घटनेने पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले. लाडक्या बहिणींना देण्यात येणारे पैसे नको, तर आम्हाला सुरक्षा द्या अशी मागणी करत आंदोलकांनी बदलापूर दणाणून सोडले होते. मात्र बदलापुरचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित झाल्याचा संशय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केला आहे. कालचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते. त्याचा लाखो रेल्वे प्रवाशांना त्रास झाला. हे व्हायला नको होते. मंत्र्यांनी आंदोलकांना समजावले. त्यांच्या मागण्याही मान्य केल्या. पण त्यानंतरही ते माघार घेत नव्हते. त्यांना केवळ सरकारला बदनाम करायचे होते, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, बदलापूर येथील झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणातील जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचे निर्देश कालच पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानुसार कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे. आरोपीवर जे काही कलम आहेत, पोक्सो असेल कठोरातील कठोर कलम आरोपीवर लावण्याचे निर्देश दिले आहेत. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकरणाची चौकशी फास्ट ट्रॅकवर नेण्यात आली आसून एसआयटी नेमण्यात आली आहे. तसेच ज्या पोलिस अधिकार्यांनी कारवाईमध्ये दिरंगाई केली त्यांना देखील निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे या परिवाराच्या मागे संपूर्ण सरकार आहे आणि या कुटुंबाला जे काही सहकार्य लागेल ते संपूर्ण सहकार्य सरकार करेल. संस्थाचालकांशी चर्चा करून संस्थेतील मुलींना सांभाळण्यासाठी तिथे महिला कर्मचारीच असल्या पाहिजेत तसेच या सुचनांचे पालन जे कोणी संस्थाचालक करत नसतील त्यांच्यावर देखील कठोर कारवाईचे निर्देश शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहेत. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणून कठोरातील कठोर कारवाई तसेच कठोर नियम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदेंनी दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
COMMENTS