हिंगोली/नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (शिंदे गट) चे कळमन

हिंगोली/नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (शिंदे गट) चे कळमनुरी मतदारसंघातील आमदार संतोष बांगर यांच्या वंजारवाडा येथील निवासस्थानी मध्यरात्री पोलिसांनी झडती घेतली. सुमारे शंभर पोलीस या कारवाईत सहभागी असल्याचा दावा आमदार संतोष बांगर यांनी केला असून भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झाल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला आहे.
मध्यरात्री पोलिसांची धाड : फ्रीजपासून कपड्यांपर्यंत तपासणी
मध्यरात्री मुलं झोपेत असतानाच पोलिस पथकाने ‘सर्च वॉरंट’ असल्याचे सांगत घराची तपासणी सुरू केली. घरातील फ्रीज, कपाटे, कपडे तसेच सर्व साहित्याची पाहणी करण्यात आल्याचे बांगर यांनी सांगितले. याचदरम्यान त्यांच्या पुतण्यांना, भाच्यांना नोटिसा देण्यात आल्या असून त्यांनी व्यायामशाळेचीही तपासणी केली आहे. आमदार बांगर यांनी ही हिंगोली पोलिसांची कारवाई ‘राजकीय प्रेरणेने झालेली’ असल्याचा आरोप केला. भाजप आमदारांकडून पोलिसांवर दबाव टाकून माझ्यावर अन्याय होत आहे, असे बांगर म्हणाले.
निवडणूक तोंडावर ः आरोप-प्रत्यारोपांना ऊत
हिंगोलीत मुख्यमंत्र्यांची सभा होत असताना ही कारवाई झाल्यामुळे या घटनेच्या टायमिंगने राजकीय चर्चेला अधिक उधाण आले आहे. नगरपरिषद निवडणूक काही दिवसांवर असताना आमदार बांगर यांनी स्वबळाचा नारा देत त्यांच्या वहिनी रेखा श्रीराम बांगर यांना मैदानात उतरवले आहे. त्यामूळे निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी बांगर यांच्यावर अवैध धंद्यामध्ये सहभागी असल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर म्हणून बांगर यांनी आता झडतीचे प्रकरण समोर आणत ‘त्यांच्यावर राजकीय सूड उगवला जात आहे’ असा पलटवार केला आहे.
राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला
शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप-या द्वंद्वाचा केंद्रबिंदू आता हिंगोली बनला आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये याचा थेट प्रभाव उमटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात येत असतानाच शिवसेनेच्या आमदाराने घराची झडती घेतल्याचा आरोप करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. शिवसेनेचा शिंदे गट व भाजप यांच्यात अंतर्गत संघर्ष उफाळून आलेला आहे व राज्यस्तरावरीही याचे परिणाम दिसून येत आहेत.

COMMENTS