सातारा / प्रतिनिधी : वातावरणाचा समतोल राखणे तसेच शेतकर्यांचे शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढवणे ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरत आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र
सातारा / प्रतिनिधी : वातावरणाचा समतोल राखणे तसेच शेतकर्यांचे शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढवणे ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरत आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने विविध पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीविषयक उपक्रम सुरू केले आहेत. या प्रयत्नांना बळ देण्यासाठी, अधिकाधिक शेतकर्यांचा सहभाग वाढावा, शेतीतून मिळणारा मोबदला वाढावा, दीर्घकालीन शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण व्हावा आणि त्यासोबत पर्यावरण संरक्षणालाही चालना मिळावी, या उद्देशाने हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश जैवविविधतेचे क्षेत्र वाढविणे तसेच शेतकर्यांस दीर्घकालीन उत्पन्न देणारी फळबाग व वृक्षलागवड करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरित वृक्षलागवड वाढवून शेतकर्यांना बळकटी देण्यासोबतच पर्यावरणीय समतोल राखण्याच्या दिलेल्या आवाहनाला ‘कमिन्स इंडिया फाऊंडेशन’ आणि ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट’ संस्थेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणार्या या उपक्रमांतर्गत शेतकर्यांच्या उपजीविकेला बळकटी देणे व पर्यावरण संवर्धनाला चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश असून, शाश्वत व हरित परिसंस्था निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल. या कार्यक्रमांतर्गत कमिन्स इंडिया फाऊंडेशनच्या सहाय्याने शेतकर्यांना अनुदान तत्वावर दर्जेदार कलमी रोपे, देशी झाडांची रोपे, ठिबक सिंचन संच, माती परीक्षण, सेंद्रिय खते तसेच फळबाग लागवडीसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन पुरविले जाते. या संपूर्ण कार्यक्रमाची अंमलबजावणी ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट’ संस्था करत आहे.
या उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यांतील फलटण तालुक्यातील शेतकर्यांच्या आणि ग्रामपंचायतीच्या पडीक, कमी कस व शेतजमिनींवर वृक्षलागवड व संवर्धनाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये केशर आंबा, साई सरबती लिंबू, आवळा, चिंच, कोकण बहाडोली जांभूळ, मोसंबी, बांबू आणि देशी झाडे जसे की अर्जुन, कांचन, कदम, भेंडी, पिंपळ, ताम्हण, बकुळ इत्यादी प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच बागेचे योग्य व्यवस्थापन करून विविध प्रकारची आंतरपीके ही घेऊ शकतात.

COMMENTS