Homeताज्या बातम्यादेश

संसदेचे आजपासून अधिवेशन

नीट परीक्षेवरून विरोधक करणार सरकारची कोंडी

नवी दिल्ली ः 18 व्या लोकसभेसाठी निवडणूक संपल्यानंतर प्रथमच संसदीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसर्‍यांद

राज्यात सरासरी 55 टक्के मतदान
मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
शिवसेनेसोबत युती तुटल्यानंतर आता भाजपने शोधला नवा जोडीदार… ‘या’ पक्षासोबत युतीची शक्यता

नवी दिल्ली ः 18 व्या लोकसभेसाठी निवडणूक संपल्यानंतर प्रथमच संसदीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसर्‍यांदा शपथ घेतल्यानंतर आजपासून संसदेच्या कामकाजाला सुरूवात होणार आहे. मात्र या अधिवेशनात विरोधक सरकारला नीट परीक्षेच्या गैरव्यवहारावरून घेरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
आजपासून सुरू होणारे अधिवेशन 3 जुलैपर्यंत चालणार आहे. एकूण दहा दिवस चालणार्‍या या अधिवेशनात एकूण 8 बैठका होण्याची शक्यता आहेत. सर्वप्रथम प्रोटेम स्पीकर भृतूहरी महताब राष्ट्रपती भवनात जाऊन शपथ घेतील. यानंतर ते सकाळी 11 वाजता लोकसभेत पोहोचतील. पहिल्या दोन दिवशी म्हणजे 24 आणि 25 जून रोजी प्रोटेम स्पीकर नवीन खासदारांना शपथ देतील. त्यानंतर 26 जून रोजी लोकसभा सभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. राज्यसभेचे 264 वे अधिवेशन 27 जूनपासून सुरू होणार आहे. त्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा-राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनात अभिभाषण करतील. अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवशी सरकार राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडणार असून त्यावर दोन्ही सभागृहात चर्चा होणार आहे. 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना तीव्र विरोधाचा सामना करावा लागणार आहे. कारण लोकसभेत भाजपचे संख्याबळ कमी झाले असून, काँगे्रसचे आणि इंडिया आघाडीचे संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे काँगे्रस सरकारला घेरण्याची जोरदार शक्यता आहे. त्यातच नीट परीक्षेतील गैरव्यवहार, त्यानंतर एनटीएच्या महासंचालकांची उचलबांगडी, नेट परीक्षा रद्द करण्याची नामुष्की, नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की, तीन फौजदारी कायदे आणि लोकसभा निवडणुकीनंतर शेअर बाजारातील अनियमिततेच्या आरोपांवरून विरोधक सरकारला घेरण्याची जोरदार शक्यता आहे.

दरम्यान, यावेळी भाजपचे ओडिशाचे सात वेळा खासदार असलेले भृतूहरी महताब प्रोटेम स्पीकर बनले आहेत. काँग्रेसने 8 वेळचे खासदार कोडीकुन्नील सुरेश यांना स्पीकर करण्याची मागणी केली होती. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, काँग्रेसचे खासदार सतत जिंकलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठतेला कोणताही आधार नाही. प्रोटेम स्पीकरला मदत करण्यासाठी राष्ट्रपतींनी पीठासीन अधिकारी म्हणून 5 खासदारांची नियुक्ती केली आहे. यापैकी के. सुरेश (काँग्रेस), सुदीप बंदोपाध्याय (टीएमसी), टीआर बालू (डीएमके) आणि भाजपकडून राधामोहन सिंग, फगन सिंग कुलस्ते यांच्या नावांचा समावेश आहे.

लोकसभा सभापतीपदी कुणाची लागणार वर्णी ? – लोकसभा सभापतीपद भाजपकडेच राहावे, यासाठी भाजप आग्रही आहे. कारण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी मंत्र्यांची बैठक झाली. लोकसभा अध्यक्षांबाबतही चर्चा झाली. भाजपला लोकसभा सभापतीपद त्यांच्या पक्षाचाच हवा आहे. भाजप ओम बिर्ला यांना दुसर्‍यांदा स्पीकर बनवू शकते. राजस्थानमधील कोटा येथील खासदार बिर्ला गेल्या वेळीही लोकसभेचे अध्यक्ष होते. भाजपचे मित्रपक्ष जेडीयू आणि टीडीपी यांच्यात सभापतीपदाची मागणी होती. त्यानंतर जेडीयूने भाजपच्या कोणत्याही निर्णयाला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.

COMMENTS