मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) आणि आमचे वैचारिक व्यासपीठ एकच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे या
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) आणि आमचे वैचारिक व्यासपीठ एकच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही त्यांचे दोघेही नातू पुढे चाललो आहोत. सध्याच्या हुकूमशाही राजवटीत निराश न होता लोकशाही व स्वातंत्र्य टिकविण्यासाठी आपण जे जे सोबत येतील, त्यांना घेऊन एकत्र आले पाहिजे, असे स्पष्ट मत शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी नमूद केले.
प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाचा रविवारी दादरमधील शिवाजी मंदिरात लोकार्पण सोहळा पार पडला या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते. कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आबंडेकर, शिवसेना नेते सुभाष देसाई, प्रबोधनकार डॉट कॉम संकेतस्थळाचे संपादक सचिन परब आदी उपस्थित होते. देशाची राज्यघटना आणि लोकशाही पायदळी तुडविणारे सरकार देश चालविण्यासाठी लायक नसल्याने ते खाली खेचले पाहिजे. सरकारला न्याययंत्रणाही गुलाम करायची असेल, तर न्यायालये बंद करा, असा ठाकरे यांनी केंद्र सरकार व भाजपवर केला. राज्यघटनेनुसार संघराज्य व्यवस्थेत केंद्र व राज्ये यांना समान अधिकार असून राज्ये केंद्राची गुलाम नाहीत, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. कोठे गोमांस सापडले, तर एखाद्याला जमावाकडून ठार मारले जाते. पण एका मुलीवर बलात्कार होतो, कुटुंबीयांची हत्या होते, पण आरोपींना माफी देऊन सत्कार केला जातो. हे आमचे हिंदूत्व नाही, असा टोला ठाकरे यांनी भाजपला बिल्कीस बानू प्रकरणाचा उल्लेख करून मारला.न्यायवृंदाने न्यायमूर्ती नियुक्तीसाठी शिफारस करण्याची पद्धत पारदर्शी नाही, असे केंद्रीय कायदामंत्री किरण रिज्जीजू यांच्या वक्तव्याचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले, सर्वसामान्यांना न्याय मिळविण्यासाठी न्यायालयांचाच आधार उरला आहे. आता केंद्र सरकारला न्यायालयेही नियंत्रणाखाली आणून गुलाम बनवायची आहेत का? पंतप्रधानांनाच न्यायमूर्ती नियुक्त्यांचे अधिकार द्यायचे का? त्यापेक्षा न्यायालये बंदच करा, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक -अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांना युती करण्यासंदर्भात ठाकरे यांनी या कार्यक्रमात साद घातली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवशक्ती व भीमशक्ती पुन्हा एकत्र येण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. प्रकाशजी, आता आपण एकत्र आलो आहोत, आतापर्यंत बाबासाहेब आणि बाळासाहेब यांच्या फोटोंना अभिवादन करायचो. आता दोन नातू एकत्र आले आहेत. कुटुंब एकत्र आले आहे. आपल्या दोघांचेही वैचारिक व्यासपीठ एकच आहे. दोन्ही विचारांचे वारसे घेऊन आपण पुढे चाललो आहोत. जर आपण एकत्र आलो नाही तर आपल्याला आजोबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सत्तापिपासू लोकांना सत्तेतून खाली खेचा – स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी जे प्रयत्न करतील त्यांच्यासोबत आम्ही जायला तयार आहोत. केंद्राच्या गुलामीत राज्य नाही. राज्य आणि केंद्राला समान अधिकार आहेत. सगळे मलाच पाहिजे या हव्यासापोटी सत्ता काबीज केली जात आहे, असा आरोप करत ‘सत्तापिपासू लोकांना सत्तेतून खाली खेचा’ असे आवाहन माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

COMMENTS