शहीद भीम योद्धा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वना पर भेट घेण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष
शहीद भीम योद्धा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वना पर भेट घेण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्रात भेट देऊन गेले. या भेटीदरम्यान त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या पोलिसांनीच केली, असा आरोप केला. या संदर्भात त्यांनी विचारधारेला जबाबदार धरत सोमनाथ सूर्यवंशी ला पोलिसांनीच मारले, असा थेट आरोप केला. या आरोपाला उत्तर देताना महाराष्ट्राचे नव निर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी हे द्वेष पसरवण्यासाठीच परभणी येथे भेट देऊन गेले, अशी टीका केली. अर्थात, या दोन्ही नेत्यांच्या संभाषणाची बाब जर आपण पाहिली, तर, एक तटस्थ भूमिका घेऊन जर आपण या भूमिकेचं विश्लेषण करायचं म्हटलं, तर, एका कार्यकर्त्याचा – व्यक्तीचा जीव गेला आहे. त्याचा जीव जो गेला, त्याला काहीतरी कारण आहे! या कारणाची मीमांसा होत असताना, संविधान हे व्यक्तीच्या जीवित आणि वित्त रक्षणाची हमी देते. हा जर आपण सगळा भाग पाहिला तर, ज्या पद्धतीने पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जातो आहे, ते देखील चूक आहे. ज्या पद्धतीने लोकसभेतील विरोधी पक्ष नेते पिडिताच्या कुटुंबीयांना भेट देत आहेत, यात राजकारण देखील असू शकते! अर्थात, या दोन्ही बाबी आपण जर वजा केल्या तर, निश्चितपणे जो शहीद झाला आहे, ज्याचे प्राण गेले आहेत, त्या व्यक्तीच्या पश्चात त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळायला हवा; ही सर्वसाधारण महाराष्ट्राच्या जनतेची भावना आहे. त्यामुळे हा न्याय कसा मिळेल? ज्या पद्धतीने यंत्रणा एखाद्या व्यक्तीला आंदोलनाच्या अनुषंगाने मारहाण करत असतील, तर, ती पोलीस यंत्रणा देखील निश्चितपणे कुठल्यातरी विचारांनी ग्रसित आहे; असं म्हणायला वाव आहे! तर, दुसऱ्या बाजूला ज्या पोलिसांच्या मारहाणीचा आरोप वारंवार केला गेला आहे, त्यांची चौकशी करण्याऐवजी, त्याचा मृत्यू आजारपणाने झाला, असं थेट विधान करणं हे देखील तितकच चूक आहे! त्यामुळे राजकारणाच्या या भांडणांमध्ये व्यक्तीला आणि समाजाला न्याय नाकारला जातो आहे काय? असा प्रश्न साहजिकपणे उभा राहतो. सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचा विद्यार्थी होता. आंदोलनात सामील होता. ज्या दिवशी तो आंदोलनात सामील होता, त्या दिवशी त्याची वैचारिक भूमिका लेखन सुरू होतं. प्रत्यक्ष त्याचे फोटोही त्या अनुषंगाने आलेले आहेत. तर, असा व्यक्ती अवघ्या तीन ते चार दिवसांमध्ये प्राणास कसा मुकु शकतो? हा प्रश्न साहजिकपणे उभा राहतो. मागासवर्गीयांच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती शिकल्यानंतर त्या संपूर्ण कुटुंबाचा ती आधार बनते. हा आधार म्हणजे म्हाताऱ्या झालेल्या किंवा वृद्ध आई-वडिलांच्या आरोग्याची, भरणपोषणाची काळजी घेणारा असतो. बहिणींच्या भावांचं तो आर्थिक व्यवस्थापन करणाराही असतो. त्यांची लग्न असेल, शिक्षण असेल या सगळ्या गोष्टींचाही भार उचलणारा असतो. त्याचबरोबर समाजाच्या लढ्यांमध्ये सामील होतो. अशा व्यक्तीला जेव्हा प्राण गमवावा लागतो, तेव्हा समाज घटकातील कित्येक जणांची वैयक्तिक हानी देखील होते! त्याचबरोबर समाजाचा एक वैचारिक प्रवाह वाहून नेणारा एक कार्यकर्ता, हा देखील त्या समाजातून नष्ट होतो, ही बाब गंभीरपणे समाज घटकातील राजकीय धुरिणांनी समजून घेणे गरजेचे आहे. व्यक्ती हा कोणत्याही व्यवस्थेतला अंतिम घटक असतो. लोकशाही त्या अंतिम घटकाचाच विचार प्रामुख्याने करते. त्यांच्याच मतांवर उभी राहिलेल्या लोकशाहीचा डोलारा, हा त्या व्यक्तीच्या जीवित रक्षणाची हमी देतो. अशा वेळी त्या व्यक्तीला समजून घेऊन पोलिसांना क्लीन चीट देण्यापूर्वी, किमान त्यांच्या चौकशीची भाषा तरी विधानसभेसारख्या सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांनी वापरावी; अन्यथा, दमण यंत्रणा या इतक्या मोकाट होतील की, समाज जीवनातील कोणत्याही व्यक्तीला जगणं कठीण करतील! त्याचबरोबर, सध्या समाज जीवनामध्ये जी वेगवेगळी आंदोलन होतात, त्या आंदोलनाला कुठल्यातरी एका हिंसक ढाच्यामध्ये टाकण्याचा जो राजकीय सत्ताधारी प्रकार करत आहेत, तो देखील भयावह आहे. समाजातील लोक हे सरकारचे पाल्य असतात. हातामध्ये सत्ता आल्यानंतर त्या पाल्यांचा संवेदनशीलपणे आणि सहानुभूतीपूर्वक विचार करूनच, सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता चालवली पाहिजे. सत्ता ही व्यक्ती आणि समाजाच्या कल्याणासाठी उत्थानासाठी असते. ती त्यांच्यावर त्वेषाने तुटून पडण्यासाठी नाही; हे भान राजकीय सत्ताधाऱ्यांनाही असावं आणि विरोधकांनाही असावं ! कारण, आपल्या वैचारिक भूमिकेसाठी जीवन जगणाऱ्या कार्यकर्त्यांना कुत्रा-मांजराप्रमाणे जर मारून टाकल जात असेल, तर, ती व्यवस्था किंवा त्या यंत्रणा नेमक्या कोणासाठी काम करतात? ही बाब फार महत्वाची असते. समाज जीवनात व्यक्ती हा फार महत्त्वाचा घटक आहे. अंतिम घटक म्हणूनही व्यक्तीला जोपर्यंत कोणतीही सत्ता राजकीय विरोधक विचार करत नाही, तोपर्यंत, त्याच्या कल्याणाची भूमिका ठरत नाही. व्यक्तीच्या कल्याणाची भूमिका जर ठरली नाही, तर, ती कुठलीही यंत्रणा ही व्यक्ती विकासाच्या आणि पर्यायाने समाजाच्या उत्थानाची आहे, यावर विश्वास ठेवता येत नाही. यामुळे, राजकीय सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही घटकांनी व्यक्तीचे मूल्य समाज जीवनात काय आहे, हे गंभीरपणे समजून घेणे आवश्यक आहे.
COMMENTS