Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर विरोधक आक्रमक

विरोधकांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळला

मुंबई/प्रतिनिधी ः राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरूवात झाले आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता नसल्यामुळे विरोधकांची बाजू कमकुवत

अल्पवयीन मुलीला मुंबईला पळवून नेत तिच्यावर अत्याचार
कॅन्टोमेंट बोर्डाला साडेचार कोटी रुपयाचे निधी मंजूर
सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्या

मुंबई/प्रतिनिधी ः राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरूवात झाले आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता नसल्यामुळे विरोधकांची बाजू कमकुवत असतांना, काँगे्रस नेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव मांडत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर बाळासाहेब थोरात यांचा स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळल्यानंतर विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्या नंतर विरोधी पक्षाने सभात्याग केला.
दरम्यान, विरोधकांच्या शेतकरी प्रश्‍नांवर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात बोगस बियाणे व खतांची विक्री करणार्‍यांविरोधात कडक कायदे करण्यात येतील. बोगस बियाणे व खते विकणार्‍या संबंधित कंपन्यांवरच कारवाई करून त्यांच्याकडून शेतकर्‍यांना भरपाई मिळावी, अशी तरतूद केली जाईल, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बोगस बियाणे व खतांचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बोगस बियाणे, खते विकणार्‍यांवर अजामिनपात्र गुन्हे दाखल करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. हे कायदे आणखी कडक केले जातील. ज्या कंपन्यांची बोगस खते व बियाणे आढळली, त्या कंपन्यांवर कारवाईसाठी सरकार पाऊल उचलेल. अशा कंपन्यांकडून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न केले जातील. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकार पुर्णपणे शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे आहे. आतापर्यंत नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने शेतकर्‍यांना 10 हजार कोटींची मदत दिली आहे. केवायसी प्रकिया पूर्ण न केल्यामुळे काही शेतकरी अद्याप या मदतीपासून वंचित आहेत. त्यांनाही लवकरच मदत दिली जाईल, अशी ग्वाहीही फडणवीसांनी दिली.

दुबार पेरणीची वेळ आल्यास मदतीसाठी तयार – पावसाअभावी शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची वेळ आली तर त्यांना मदत करण्यासाठी सरकार तयार आहे. यासाठी सरकारने विशेष आराखडाही तयार केला आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात अद्याप अपेक्षित पाऊस पडला नसला तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास 80 टक्के पेरण्या झाल्या आहेत. पुणे विभागात पेरण्यांचे प्रमाण यापेक्षा कमी आहे. हवामान विभागाने पुढे काही दिवसांत चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तरीदेखील पाऊस पडलाच नाही तर सरकारने आपत्कालीन व्यवस्थेसाठी तयारी करून घेतली आहे. शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची वेळ आली तर यासाठी सरकारने विशेष प्लॅन तयार असल्याचे त्यांनी सांगितले.  

राज्यात फक्त 20 टक्के पेरण्या ः थोरात – राज्य सरकार फक्त मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि दिल्लीवारीमध्ये मश्गुल आहेत, त्यामुळे त्यांना शेतकर्‍यांचा आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा विसर पडल्याची बोचरी टीका काँगे्रस नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधानसभेत केली. थोरात यावेळी म्हणाले, मान्सून उशिरा सुरू झाल्याने खरिपाच्या पिकांची आणि शेतकर्‍यांची स्थिती गांभीर्यपूर्वक झाली आहे, आतापर्यंत फक्त 20 टक्के पेरण्या झाल्या आहेत, अशी परिस्थिती महाराष्ट्राची आहे. त्यामुळे शेतकरी पूर्ण हवालदिल झालेला आहे. राज्यात केवळ 50 टक्के पाऊस झाले आहेत. त्यामुळे राज्यातील स्थिती भीषण असल्याचे त्यांनी सरकारच्या नजरेत आणून दिले.

अर्ध्या तासानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब – पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केवळ अर्ध्या तासातच विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. विरोधी पक्षाने सभात्याग केल्यानतंर संसद आणि विधिमंडळातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून आज दिवसभराो कामकाज तहकूब करण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांनी कामकाज सुरु होताच जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला आहे.

COMMENTS