Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रचाराच्या पहिल्याच दिवशी भाजपात विसंवादाचा भडका !

प्रचार शुभारंभ करताना निष्ठावंत कार्यकर्त्यांची अनुपस्थिती, संघटनात्मक दुर्लक्ष उघडनांदेड । प्रतिनिधीनांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निव

९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही… भाजप नेत्याने उधळली मुक्ताफळे…
मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर निश्‍चित
भाजपकडून बंडखोरांची मनधरणी सुरू

प्रचार शुभारंभ करताना निष्ठावंत कार्यकर्त्यांची अनुपस्थिती, संघटनात्मक दुर्लक्ष उघड
नांदेड । प्रतिनिधी
नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ तरोडा खुर्द गावातील मारुती मंदिरात पक्षाचे खा. डॉ. अजित गोपछडे, माजी मंत्री डी. पी. सावंत, महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, भाजपाचे नेते बालाजी शिंदे कासारखेडकर,ड. चैतन्य (बापू) देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये नारळ फोडून करण्यात आला. मात्र या शुभारंभालाच भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची, मंडळ पदाधिकार्‍यांची आणि संघटनेच्या कणा समजल्या जाणार्‍या बुथ प्रमुख व शक्ती केंद्रप्रमुखांची प्रकर्षाने अनुपस्थिती दिसून आली. त्यामुळे प्रचार सुरू होताच भाजपातील अंतर्गत विसंवाद, अस्वस्थता आणि संघटनात्मक दुर्लक्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे.
विशेष म्हणजे, या प्रचार शुभारंभाची माहितीच अनेक मंडळ पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्त्यांना देण्यात आली नव्हती, असा आरोप खुद्द भाजपातील कार्यकर्त्यांकडूनच केला जात आहे. पक्षासाठी वर्षानुवर्षे राबणार्‍या कार्यकर्त्यांना डावलून प्रचार सुरू करणे म्हणजे संघटनेच्या पायावरच कुर्‍हाड मारण्यासारखे आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे हा केवळ योगायोग नसून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये बळावत आहे.काँग्रेस मधून भाजपात आलेल्या चारही कार्यकर्त्यांना भाजपाने या निवडणुकीमध्ये पुन्हा संधी दिल्यामुळे निष्ठावंतगट भाजपाच्या प्रचारापासून दूर आहे. काँग्रेस मधून आलेल्या माजी नगरसेवकांना भाजपाची कार्य संस्कृती व संघटनात्मक रचना तसेच निष्ठावंत गटाला मानसन्मान देण्याची पद्धत अजूनही लक्षात न आल्यामुळे निष्ठावंतांना मानसन्मान दिला जात नसल्याची खंत भाजपाच्या जुन्या पदाधिकार्‍यांनी यावेळी बोलून दाखवली. भाजपामध्ये सध्या काँग्रेस मधून आलेल्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना रेड कार्पेट अंथरली जात आहे, परंतु त्याचवेळी निष्ठावंतांना मात्र अडगळीत टाकल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. पक्षांमध्ये अंतर्गत खदखद असल्याचे बोलले जात आहे. भाजपाची ताकद म्हणून ओळखली जाणारी बुथरचना आणि शक्ती केंद्रप्रमुखांची यंत्रणा गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्याचा सूरही यानिमित्ताने पुन्हा उमटू लागला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही यंत्रणा सक्रिय न ठेवता केवळ वरवरच्या प्रचारावर भर दिला जात असल्याचा आरोप स्थानिक पातळीवर केला जात आहे. बुथ जिंकला तरच निवडणूक जिंकता येते, हे भाजपाचेच जुने सूत्र असताना, त्याच बुथ रचनेला डावलले जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा स्फोट होत आहे. याच पार्श्वभूमीवर तरोडा मंडळाचे अध्यक्ष सुनील राणे यांनी अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपाला मोठा संघटनात्मक धक्का बसला आहे. राणे हे संघटन बांधणीमध्ये सक्रिय मानले जात होते. त्यांच्या पक्षत्यागामुळे केवळ नेतृत्वाचा नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या मनोबलाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या घडामोडींचा थेट फटका प्रभाग क्रमांक एकमधील भाजपाच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. दरम्यान, या परिस्थितीची गंभीर दखल घेत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आता निष्ठावंत कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असल्याची माहिती आहे. प्रचारात सर्वांना सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले असले, तरी उशिरा सुचलेले शहाणपण अशीच प्रतिक्रिया काही कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे. प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात निर्माण झालेली ही दरी भरून काढणे भाजपासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. एकंदरीत, प्रभाग क्रमांक एकमध्ये भाजपाचा प्रचार शुभारंभ जितका धार्मिक विधीने झाला, तितकाच तो संघटनात्मक विसंवादाने चर्चेत आला आहे. निष्ठावंत कार्यकर्ते, बुथ रचना आणि शक्ती केंद्रप्रमुख यांना विश्वासात न घेता निवडणूक रणांगणात उतरल्यास त्याची किंमत मतपेटीत मोजावी लागू शकते, असा इशारा आता खुद्द भाजपातीलच कार्यकर्ते देत आहेत.

COMMENTS