केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२५ चा निकाल नुकताच २२ एप्रिल रोजी जाहीर झाला. यामध्ये, देशातील १००९ उमेदवारांनी यूपीएससीची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२५ चा निकाल नुकताच २२ एप्रिल रोजी जाहीर झाला. यामध्ये, देशातील १००९ उमेदवारांनी यूपीएससीची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली. शक्ती दुबे या युवतीने देशात सर्वोच्च क्रमांक पटकावत, यश मिळवले आहे. तर, या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये देशातील ३१८ ओबीसी उमेदवार यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातून एकूण ३३५ उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्ग यामध्ये केवळ १७ उमेदवारांचे अंतर दिसते. म्हणजे ओबीसी उमेदवार या स्पर्धेमध्ये आता चांगली यशस्विता मिळवताना दिसत आहेत. अर्थात, यामध्ये आर्थिक निकषावर म्हणजेच ईडब्लूएस वर जे आरक्षण आहे, त्यामध्ये देखील १०९ उमेदवारांनी यश मिळवले आहे. त्यामुळे ३३५ अधिक १०९ म्हणजे जवळपास ४४४ विद्यार्थी उमेदवार हे सर्वसाधारण जाती समाज रचनेच्या नुसार दिसतात. अनुसूचित जाती मधून १६० उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोग यशस्वीपणे पार पडली. त्याच प्रमाणात अनुसूचित जमाती या प्रवर्गातून ८७ उमेदवारांनी या परीक्षेत यश मिळवलं. देशाच्या प्रशासन सेवेचा कणा असलेल्या आयएएस, आयपीएस, आयएफएस अशा प्रकारच्या या सेवांमध्ये देशाचं संपूर्ण प्रशासन सामावलेले असते. त्यामुळे, अतिशय मोक्याच्या असलेल्या या परीक्षांमधून देशाचे खरे राज्यकर्ते निर्माण होतात. अर्थात, कोणत्याही सरकारमधील मंत्री पाच वर्षासाठी असतात; परंतु, एकदा का केंद्रीय लोकसेवा आयोगात यश मिळवलं, तर, ती सेवा किमान ३५ ते ४० वर्ष देशाला देता येते. अतिशय मोक्याच्या आणि देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण वाटा निभावत असलेल्या प्रशासनिक सेवेच्या या यशाला, देशात नेहमीच आश्चर्याने पाहिले जाते. नुकत्याच यशस्वी झालेल्या या उमेदवारांना वेगवेगळ्या प्रवर्गात सामावून घेण्यात येईल. त्यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप डी मधील सर्विसेस मध्ये त्यांना सामावून घेण्यात येईल. अर्थात, यामध्ये भारतीय प्रशासनिक सेवेमध्ये यातील ७३ उमेदवार हे खुल्या प्रवर्गातून प्रवेश करतील तर १८ उमेदवार हे आर्थिक मागासवर्गीय या प्रवर्गातून प्रवेश करतील; तर, जवळपास ५२ उमेदवार हे ओबीसी प्रवर्गातील आयएएस या कॅटेगरीमध्ये समाविष्ट झाले आहेत. तर, याच ग्रुपमध्ये अनुसूचित जातीची २४ आणि अनुसूचित जमातीचे १३ उमेदवार सामील होतील. त्याचप्रमाणे आयपीएस म्हणजे भारतीय पोलीस सेवा यामध्ये खुल्या प्रवर्गातून ६०, आर्थिक मागासवर्गीयातून १४ आणि ओबीसी या प्रवर्गातून ४१ उमेदवारांचा समावेश होईल; तर, अनुसूचित जाती आणि जमातीचे अनुक्रमे २२ आणि १० उमेदवारांचा समावेश होईल. त्याचप्रमाणे भारतीय विदेश सेवा यामध्ये खुल्या प्रवर्गातील २३ उमेदवारांचा समावेश होईल. तर, आर्थिक मागासवर्गीयातून पाच उमेदवारांचा समावेश होईल. ओबीसींचे या प्रवर्गात एकूण १३ उमेदवार असतील! तर, अनुसूचित जाती आणि जमातीचे अनुक्रमे नऊ आणि पाच उमेदवार सामील होतील. या मुख्य तीन सेवांमध्ये विभाजित झाल्यानंतर उर्वरित सर्व उमेदवार ग्रुप ए आणि ग्रुप बी यामध्ये त्यांचा समावेश होईल. अर्थात सर्वच विभागातील ज्या मोक्याच्या जागा असतात, त्या या परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांनाच दिल्या जातात. त्यामुळे, भारतीय प्रशासनिक सेवेचा जो कणा मजबूत होताना दिसतो, त्यामध्ये आता सर्व समावेशक खासकरून ओबीसी समूहांना मोठ्या प्रमाणात आता यश मिळत आहे; ही अतिशय आनंदाची बाब आहे.
COMMENTS