डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडला. लोकसभा निवडणुकीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे धोक्यात आहे म्हणून, केंद्र सरकारला बहुमतापासून दूर ठेवणाऱ्या जनतेने, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका महायुतीला मोठ्या प्रमाणावर मतदान केले तरीही, शपथविधीच्या पूर्वसंध्येला पक्षाच्या विधिमंडळ नेते पदावर देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर, त्यांनी सर्वात प्रथम पहिले अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केले. यावरून, हे स्पष्ट आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आणि त्यांचे विचार कोणत्याही राजकीय पक्षाला सत्तेत राहण्यासाठी अवश्यंभावी आहेत. लोकसभा निवडणुकीत संविधानाच्या मुद्द्यावर संपूर्ण भारतातील जनता ज्या पद्धतीने मतदानातून अभिव्यक्त झाली, ते पाहता महाराष्ट्र विधानसभाच्या निवडणुकीत देखील वातावरण बदलेल; परंतु, महायुतीला बहुमत मिळाले. अर्थात, हे बहुमतवादातित नसले तरीही, नंतरच्या वादाला फारसे काही महत्व उरत नाही. देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, हा विश्वास स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेलाही वाटत होतं. परंतु, प्रत्यक्षात त्यांना मुख्यमंत्री पदावर नियुक्ती देण्यासाठी पक्षाच्या हाय कमांडने जो वेळ घेतला, तो, महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात अधिक वेळ आहे, हे मात्र नमूद करायला हवे! या काळामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी अनेक नावांची चर्चा झाली. खासकरून मराठा आणि ओबीसी यांच्या आरक्षणाच्या संघर्षातून निर्माण झालेली परिस्थिती पाहता राज्याचा समग्र ओबीसी महायुतीच्या दिशेने वळला होता. परंतु, मराठवाड्यासारख्या भागात महायुतीला बहुमत मिळाले. याचे, कारण महायुतीने त्या ठिकाणी चाणाक्ष धोरण अवलंबले! उमेदवार देताना त्यांनी मराठा उमेदवार दिले आणि महायुतीचे उमेदवार म्हणून ओबीसींनी त्याच मराठा उमेदवारांना मतदान दिले! याचा अर्थ, मराठा आणि ओबीसी यांच्या संघर्षातही धूर्तपणे त्यांची मते आपल्या पारड्यात कशी पाडून घ्यावी, याचं एक तंत्रबद्ध नियोजन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं. त्यामध्ये त्यांना यश मिळालं. त्या यशाचा परिणाम म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर आज आले आहेत. अमित शहा यांनी महाराष्ट्रात प्रचार करत असताना देवा भाऊ यांना मुख्यमंत्री बनवायचं असल्याचा आव्हान महाराष्ट्राच्या जनतेसमोर केलं होतं. अखेर दहा दिवसानंतर का असेना परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांनाच विराजमान केले गेले. अर्थात, भाजपाच्या अंतर्गत ओबीसी आणि मराठा नावांचाही उल्लेख आणि चर्चा केल्या गेल्या. मात्र, सगळ्या बाबींच्या शेवटी संघाचा मोठ्या प्रमाणावर देवेंद्र फडणवीस यांनाच पाठिंबा असल्यामुळे, त्यांची निवड अखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर झाली आता महाराष्ट्राचे एक माजी मुख्यमंत्री आणि एक माजी उपमुख्यमंत्री हे दोन्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री झालेले आहेत. लवकरच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्यासाठी कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील यावर ही चर्चा होऊन त्या वाटाघाटी झाल्यानंतर मंत्रिमंडळ प्रत्यक्षात येईल. परंतु, आता मुख्यमंत्री मिळाल्यामुळे महाराष्ट्राच्या कारभाराला वेग येईल ही अपेक्षा करायला हरकत नाही!
COMMENTS