कोरोनाचा सामना करायचाय…गट-तट आता पाहू नका ; जिल्हाधिकारी ड़ॉ. भोसलेंचे गावा-गावांतील सरपंचांना आवाहन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाचा सामना करायचाय…गट-तट आता पाहू नका ; जिल्हाधिकारी ड़ॉ. भोसलेंचे गावा-गावांतील सरपंचांना आवाहन

गावांमधील दूध संकलन केंद्रे, किराणा दुकाने, भाजीपाला विक्री केंद्रे, विविध कार्यकारी सोसायटी, बँका याठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता गावकर्‍यांनी व गावांतील पदाधिकार्‍यांनी घेतली पाहिजे.

लोककलावंत शांताबाई लोंढे यांचा 5 लाख देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
सहकार बळकटीकरणासाठी पंतप्रधान मोदींचे प्रयत्न-बिपीनदादा कोल्हे
कांद्याला एक रुपये भाव मिळाल्याने शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर/प्रतिनिधी- गावांमधील दूध संकलन केंद्रे, किराणा दुकाने, भाजीपाला विक्री केंद्रे, विविध कार्यकारी सोसायटी, बँका याठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता गावकर्‍यांनी व गावांतील पदाधिकार्‍यांनी घेतली पाहिजे. प्रशासनाला सहकार्य म्हणजे गावाने गावकर्‍यांनाच सहकार्य करण्यासारखे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच सर्वांनी मिळून आता या कोरोनाचा सामना करायला हवा. गटतट पाहण्याची ही वेळ नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हाभरातील सर्व सरपंचांना केले आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. भोसले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी नगर, नेवासा, श्रीरामपूर, राहुरी, अकोले आणि संगमनेर तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. आदर्श गाव योजना समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यावेळी उपस्थित होते. पहिल्या सत्रात नगर आणि नेवासा, त्यानंतर श्रीरामपूर आणि राहुरी आणि शेवटी अकोले आणि संगमनेर तालुक्यातील सरपंच आणि ग्रामस्तरीय अधिकारी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हास्तरावरुन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके सहभागी झाले होते. तालुकास्तरावरुन संबंधित तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले होते. दुसर्‍या दिवशी कोपरगाव, राहाता, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील ग्रामस्तरीय अधिकारी तसेच तालुकास्तरीय अधिकारी यांच्याशीही असा संवाद झाला. वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासनातील विविध विभाग त्यासाठी कार्यरत आहेत. आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. त्यासोबतच निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यातील रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत असून ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी आता ग्रामस्तरावरील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी नियमितपणे संवाद साधून त्यांना या उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत गंभीरपणे कार्यवाही करण्याबाबत आवाहन करीत आहेत

नियमांचे काटेकोर पालन हवे

ग्रामपंचायत हे युनिट मानून काम करा, असे आवाहन करून डॉ. भोसले म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेत तीव्रता कमी असतानाही सगळ्यांनी नियम पाळले. बाहेरुन व्यक्ती आली की गावात त्याला विलगीकरणात ठेवले जायचे. मात्र, आता एकीकडे रुग्णसंख्या वाढत असतानाही नागरिक गांभीर्याने याकडे पाहत नाहीत, ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे लक्षणे दिसल्यास संबंधित व्यक्तीने तात्काळ स्वतःला तपासून घेतले पाहिजे. व्यवस्थित काळजी घेतली तर रुग्ण बरा होऊ शकतो. प्रशासन म्हणून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंग पाळणे, हात वारंवार धुणे, सॅनिटायझरचा वापर कऱणे, चेहर्‍यावर मास्क लावणे या बाबी पाळल्याच पाहिजेत. कोरोनासारख्या महामारीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही तर त्यासाठी स्वयंशिस्त पाळणे महत्वाचे आहे. रोगाच्या सुरुवातीलाच उपचार केला तर आपल्याला ऑक्सिजनचा वापर, व्हेंटिलेटरचा वापर जास्त प्रमाणात करावा लागणार नाही. सुरुवातीच्या टप्प्यातच व्यक्ती बरा होईल, अशा पद्धतीने सर्वांनी काळजी घ्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.  बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधणे, त्यांची चाचणी करणे, इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना शोधून त्यांची तपासणी करणे यास प्राधान्य द्या, असेही त्यांनी यावेळी सुचवले.

गावपातळीवरही जबाबदारी

जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या व हा रुग्णवाढीचा वेग रोखण्यासाठीच्या उपाययोजना, ब्रेक दि चेन अंतर्गत करावयाची कार्यवाही, चेहर्‍यावर मास्क असणे, सोशल डिस्टंन्सिंग पाळणे या कोरोना रोखण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी, बाधितांपासून संसर्ग रोखण्यासाठी सर्वेक्षण पथकांद्वारे घरोघऱी सर्वेक्षण करुन बाधितांना तात्काळ उपचारांसाठी दाखल केले जाणे आवश्यक आहे. गावपातळीवरील अधिकार्‍यांवर त्यादृष्टीने सर्वाधिक जबाबदारी असल्याचे सांगून डॉ. भोसले म्हणाले, कोरोना उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी यासंदर्भात सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचे बळकटीकरण सुरु असले तरी वाढत्या रुग्णसेवेमुळे त्यावर ताण येऊ नये यासाठी प्राथमिक पातळीवरच सर्वेक्षणाचा वेग वाढवून बाधितांना शोधण्याची मोहीम गतिमान करण्याची गरज आहे तसेच संक्रमण होणारी ठिकाणे लक्षात घेऊन तेथे प्रतिबंधात्मक नियमांचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबवण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाययोजनांची माहितीही त्यांनी दिली.

हिवरेबाजारचा घ्यावा आदर्श

जिल्ह्यात लोकसहभागातून ग्रामविकासाचे मॉडेल उभे करणार्‍या नगर तालुक्यातील हिवरेबाजार गावाने कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून, या अनुभवांचे कथन उपसरपंच पोपटराव पवार यांनी यावेळी केले. हिवरेबाजार येथे कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यात तेथील ग्रामपंचायतीने यश मिळविले आहे. त्यामुळे तेथील अनुभव आणि कशापद्धतीने तेथे कोरोनाचा मुकाबला केला गेला त्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली. 

लसीकरणाचे नियोजन गरजेचे

सध्या जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. आता 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण सुरु करण्यात आले आहे. मात्र, लसीकरणासाठी नागरिकांची होणारी गर्दी आणि त्यामुळे योग्य काळजी घेतली गेली नाही तर लसीकरणाच्या ठिकाणी असणारा संसर्गाचा धोका सर्वांनी लक्षात घ्यावा. लसीकरणासाठी आधी नोंदणी करुन व त्याप्रमाणे नियोजन करुन लसीकरण करण्यात यावे. नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये म्हणून जागृती करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या.

COMMENTS