इस्लामपूर / प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली. मात्र, सांगली जिल्ह्यातील एकही साखर कारखानदार ब्र शब्द
इस्लामपूर / प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली. मात्र, सांगली जिल्ह्यातील एकही साखर कारखानदार ब्र शब्दही उच्चारायला तयार नाहीत. सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी त्वरित रक्कम जाहीर न केल्यास स्वाभिमानी स्टाईलने उत्तर देऊ, उसाचे एकही कांडे करखान्यापर्यंत जाऊ देणार नाही, असा इशारा आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला. एफआरपी ठरण्यात राजारामबापू कारखाना अडथळा ठरत असल्याचा आरोप मंत्री जयंत पाटील यांचे नाव न घेता यावेळी करण्यात आला.
स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते एस. यु. संदे, जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, भागवत जाधव, जगन्नाथ भोसले, बाळासाहेब जाधव, रमेश पाटील, विक्रांत कबुरे, आनद जगंम, आदमीर मुजावर प्रमुख उपस्थित होते. अॅड. एच. यु. संदे म्हणाले, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 20ऊस परिषदा झाल्या. ही परिषद उसदर व धोरण ठरवते. कारखानदार आणि शेतकरी यांच्यातील सुवर्णमध्य काढून दरवर्षी एफआरपी ठरते.
मात्र, अलीकडे तीन टप्प्यात एफआरपी देण्याचे धोरण अवलंबले जात आहे. कोविडमध्ये खर्या अर्थाने शेतकरी उध्वस्त झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी एफआरपी जाहीर केली. तिकडे त्यांच्या स्पर्धा लागली असताना सांगली जिल्ह्यातील कारखानदार मात्र तोंडाला कुलूप लावून गप्प बसले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी फसवणूक केल्याचा राग अजूनही आहे. यावेळी मात्र, जोपर्यंत एकरकमी एफआरपी घोषित होत नाही, तोवर शेतकर्यांनी तोड घेऊ नये. ही चळवळ समाजाची, शेतकर्यांची आहे. सर्वांनी संघटनेला सहकार्य करावे.
वाहतूकदार, ऊस उत्पादकांनी आपले एकही कांडे कारखानदारांना देऊ नये. एफआरपी जाहीर न करता कारखान्यांनी ऊस नेण्याचे धाडस केलेच तर कारखाना कसा बंद पाडायचा हे आम्ही पाहू. एफआरपी देणे हा शासनाचा कायदाच आहे. यावेळेला कोणी आडवे आले तर त्यांना अद्दल घडवली जाईल.
जिल्हाध्यक्ष पोपट मोरे म्हणाले, राजारामबापू साखर कारखाना हा एफआरपी ठरविण्यात अडथळा ठरतो. हा कारखाना इतर कारखान्यांना एफआरपी देऊ देत नाही. याबाबत सामान्यांच्या मनात खदखद आहे. यावेळी त्यांनी कसल्याही अविर्भावात राहू नये. स्वाभिमानी स्टाईलने आम्हाला उत्तर द्यावे लागेल. यावर्षी साखरेचे दर उच्चांकी आहेत त्यामुळे एक रकमी एफआरपी द्यायला कोणतीही अडचण नाही. एफआरपी ठरवण्यात एक मजबूत बुंधा अडथळा ठरत आहे. त्याने अविर्भावात राहू नये. कसल्याही बुंध्याला हलविण्याची ताकद शेतकर्यांच्यात आहे, असा इशारा मोरे व संदे यांनी यावेळी दिला.
COMMENTS