मुंबई/प्रतिनिधी ः प्रकल्पांबाबतची आमची भूमिका स्पष्ट असून, पर्यावरणाचा विनाश करणारा प्रकल्प आम्हाला नको आहे. नाणारच्या रिफायनरीलाही आम्ही याच कार
मुंबई/प्रतिनिधी ः प्रकल्पांबाबतची आमची भूमिका स्पष्ट असून, पर्यावरणाचा विनाश करणारा प्रकल्प आम्हाला नको आहे. नाणारच्या रिफायनरीलाही आम्ही याच कारणावरून विरोध केला होता. तेथील लोकांनी आम्हाला त्यांची बाजू सांगून तशी विनंती केली होती. त्यानंतरच आम्ही त्या प्रकल्पाच्या विरोधात उतरलो होतो, अशी भूमिका ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.
बारसूमध्ये रिफायनरी उभारण्यासाठी मी पत्र दिले होेते, पण लोकांची टाळकी फोडून रिफायनरी उभी करा असे आमच्या सरकारचे धोरण नव्हते. लोकांना काय वाटते ते महत्त्वाचे आहे. बारसूबद्दलची माझी भूमिका ही तिथल्या लोकांची भूमिका, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. बारसू येथील रिफायनरीला ठाकरेंच्या शिवसेनेने विरोध दर्शवला आहे. लोकांच्या बाजूने आंदोलनात उतरण्याची घोषणा ठाकरे यांनी केली आहे. त्यावरून सत्ताधारी भाजप व शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लिहिलेले पत्र पुढे आणले होते. बारसू येथील रिफायनरीच्या प्रस्तावाबाबतचे हे पत्र होते.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे निरोप येऊ लागले. रिफायनरीसाठी आग्रह धरला जाऊ लागला. हा चांगला प्रकल्प आहे. इतर ठिकाणीही रिफायनरी होतायत. शुद्धीकरण प्रकल्प, एवढ्या लोकांना रोजगार मिळेल, असे मला सांगितले गेले. त्यानंतर मी विचार करून प्राथमिक अहवाल मागवला. ज्या ठिकाणी रिफायनरीचे स्वागत होत असेल तिथे जरूर न्या, अशी माझी भूमिका होती. चर्चेअंती बारसूची जागा समोर आली. तिथे जागा मोकळी असून काही लोकांनी मंजुरी दिल्याचे कळले. त्यानंतर सरकार गेले. मात्र, सरकार जात असतानाच बारसूच्या रिफायनरीसाठी ’ओके’ आला, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ’बारसूसाठी आम्ही पत्र लिहिले असले तरी लोकांच्या टाळक्यात दंडुके घालून ही रिफायनरी उभी करा, असे आमचे म्हणणे होते. प्रशासनाने लोकांसमोर जावे, तिथे सादरीकरण करावे. लोकांना प्रश्न विचारू द्यावे आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी. त्यातून दोघांना मान्य असेल प्रकल्प करा, असे आमच्या सरकारचे धोरण होते. तुम्ही पारदर्शकतेबद्दल बोलता मग हे करा. लोकांच्या हिताची गोष्ट त्याच्या टाळक्यात मारून का सांगताय? भल्याचे असेल त्याच्यासाठी जोरजबरदस्ती करण्याची वेळ का यावी?, असा रोकडा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
COMMENTS