Homeताज्या बातम्यादेश

नितीश कुमार नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री

राजदशी काडीमोड करून भाजपशी हातमिळवणी

पाटणा ः बिहारच्या राजकारणात रविवारी मोठी राजकीय उलथापालथ बघायला मिळाली. नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दल अर्थात राजदशी असलेली आघाडी तोडत रविवार

जगदीश पवार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान 
एसटी डेपो मंजूर करता आला नाही त्यांचे एमआयडीसीचे आश्‍वासन
केमिकल टँकरमधून गळती होऊन 6 जणांचा मृत्यू, 22 जणांवर उपचार सुरू | LokNews24

पाटणा ः बिहारच्या राजकारणात रविवारी मोठी राजकीय उलथापालथ बघायला मिळाली. नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दल अर्थात राजदशी असलेली आघाडी तोडत रविवारी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्याचबरोबर भाजपबरोबर हातमिळवणी करत सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानुसार रविवारी सायंकाळी पाच वाजता नितीशकुमार यांनी नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

नितीश कुमार यांनी भारत माता की जय आणि जय श्री रामच्या घोषणा देत शपथ घेतली. तेव्हा जीतन राम मांझी, चिराग पासवान, सम्राट चौधरी, जेपी नड्डा उपस्थित होते. नितीश यांच्यासह जनता दल (युनायटेड) नेते विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव आणि भाजप नेते सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे बिहारचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहारमधील बदललेल्या राजकीय समीकरणात नितीशकुमार यांना आता नवे मंत्रिमंडळ मिळणार असल्याने रातोरात आरजेडीचे मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडले आहेत.

दरम्यान, तत्पूर्वी नितीश कुमारांनी रविवारी राजभवनात राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे राजीनामा देताना एनडीए सरकार स्थापन करण्याचा दावाही केला. तसेच, भाजपच्या पाठिंब्याचे पत्रही त्यांनी राज्यपालांना सादर केले. हे पत्र राज्यपालांनी स्वीकारले असून रविवारी सायंकाळी पाच वाजता शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भाजपचे बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी यासंदर्भातील माहिती दिली. नितीश कुमार यांनी आज सकाळी जनता दल (संयुक्त) विधिमंडळाच्या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. या राजीनामा सत्रानंतर भाजपाने आपल्या आमदारांना घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. हे पाठिंब्याचे पत्र नितीश कुमारांनी राज्यपालांना सादर केले. यामध्ये एनडीए सरकार स्थापन करण्यास इच्छुक असल्याचं सांगण्यात आलं. हे पत्र राज्यपालांनी स्वीकारले आहे. त्यानंतर नितीश कुमार यांनी रविवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

नितीशकुमार पलटूरामांचे सरदार ः प्रशांत किशोर – गेल्या वर्षभरापासून सांगत आलो की, नितीशकुमार कोणत्याही वेळी पलटी मारू शकतात. अशी वक्तव्ये मी सातत्याने कॅमेरासमोर करत आहे. लोकांना माहित आहे की नितीशकुमार पलटूराम आणि पलटूरामांचे सरदार आहेत, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली. बेगुसराच्या जी. डी महाविद्यालयात आज पत्रकार परिषदेत प्रशांत किशोर बोलत होते. यावेळी प्रशांत किशोर म्हणाले की, आज सिद्ध झाले  की भाजपावाले तितकेच पलटूराम आहेत, जितके नितीशकुमार आहेत. भाजप चार महिन्यांआधी म्हणत होते की बिहारमध्ये नितीश कुमारांसाठी भाजपचा दरवाजा बंद आहे, परंतु, त्यांनी आता हाच दरवाजा नितीशकुमारांसाठी उघडला आहे. कालपर्यंत ज्या नितीशकुमार यांना भाजप समर्थक शिव्या घालत होते, आज त्यांनाच सुशासनाचे प्रणेते म्हणत आहेत, असाही टोला त्यांनी लगावला.

COMMENTS